सांगलीत ३८ लाखांचा गुटखा, सुपारी जप्त ट्रकसह दोघे ताब्यात : शहर पोलिसांची सापळा रचून कारवाई
By admin | Published: May 15, 2014 12:40 AM2014-05-15T00:40:41+5:302014-05-15T00:42:07+5:30
सांगली : शहर पोलिसांनी आज (बुधवार) पहाटे बायपास रोडवरून उत्तर प्रदेशकडे जाणारा ट्रक पकडून त्यामधील ३८ लाखांचा गुटखा व माव्यासाठी वापरण्यात येणारी सुपारी जप्त केली.
सांगली : शहर पोलिसांनी आज (बुधवार) पहाटे बायपास रोडवरून उत्तर प्रदेशकडे जाणारा ट्रक पकडून त्यामधील ३८ लाखांचा गुटखा व माव्यासाठी वापरण्यात येणारी सुपारी जप्त केली. याप्रकरणी ट्रकसह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती. याबाबत अधिक माहिती अशी की, कागलहून कानपूरला कर्नाटकमार्गे गुटखा व बंदी असलेली काळी सुपारी ट्रक (एमपी ०९, एचजी ६०९०) मधून जात असल्याची माहिती शहर पोलिसांंना मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे व त्यांच्या पथकाने पहाटे पाचच्या सुमारास बायपास रस्त्यावर सापळा रचला असता, हा ट्रक त्यांच्या जाळ्यात सापडला. ट्रकची झडती घेतली असता त्यात ताडपदरीखाली पाच पोती गुटखा व २८५ पोती काळी सुपारी आढळून आली. ही सुपारी मावा करण्यासाठी वापरण्यात येते. याप्रकरणी ट्रकसह चालक व क्लिनर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर शहर पोलिसांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिल्यानंतर गुटखा व काळी सुपारी ताब्यात घेण्यात आली. जप्त मालाचा उशिरापर्यंत पंचनामा करण्यात येत होता. याबाबत शहर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)