वाळूच्या डंपरखाली ३८ मेंढ्या ठार
By admin | Published: July 1, 2015 12:25 AM2015-07-01T00:25:05+5:302015-07-01T00:25:05+5:30
लांडगेवाडीजवळची दुर्घटना : करवीर तालुक्यातील मेंढपाळांना फटका
कवठेमहांकाळ : वाळूचा डंपर मेंढ्यांच्या कळपावर पलटी होऊन ३८ मेंढ्या ठार झाल्या. मिरज-पंढरपूर मार्गावर लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बसथांब्याजवळ हा अपघात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मेंढपाळांच्या या मेंढ्या आहेत.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मेंढ्या चारण्यास घेऊन जात आहेत. करवीर तालुक्यातील कोगील आणि दिंडनेर्ली गावातील मेंढपाळही मेंढ्यांचे कळप घेऊन मिरज-पंढरपूर रस्त्यावरून जात होते. सायंकाळी या दोन गावांतील सुमारे १५० मेंढ्या लांडगेवाडी गावाजवळून जात होत्या. त्याचवेळी अचानक समोरून येणारा सोळाचाकी वाळूचा डंपर (क्र. एम एच १० झेड ४८७०) मेंढ्यांच्या कळपात घुसला आणि उलटला. त्यातील वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडून आणि चिरडून सुमारे ३८ मेंढ्या ठार झाल्या; तर १५ मेंढ्या जखमी झाल्या. जखमी झालेल्या मेंढ्यांचे खुबे आणि पाय मोडले आहेत. त्याचबरोबर कातडी सोलून निघाली आहे.
मृत झालेल्या मेंढ्या कृष्णा इराप्पा कोळेकर, दादासाहेब विठोबा बंडगर (रा. कोगील, ता. करवीर), मारुती आनंदा जोंग (दिंडनेर्ली, ता. करवीर) यांच्या मालकीच्या आहेत. त्यांचा १५० मेंढ्यांचा कळप होता. त्यापैकी ९० मेंढ्या जिवंत असल्याचे मेंढपाळांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. त्याचबरोबर या परिसरातून कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढ्या घेऊन चाललेल्या मेंढपाळांनीही एकच गर्दी केली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक गर्दीवर आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. व्ही. एस. बुटे, डॉ. आर. व्ही. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने जखमी मेंढ्यांवर उपचार सुरू केले. सेनापती मसाले, पाटील यांनी मदत केली.
या अपघातात सुमारे ३८ मेंढ्या मृत झाल्याचे आणि ढिगाऱ्याखाली अडकल्याचे मेंढपाळांनी सांगितले. अपघातानंतर सोळाचाकी डंपरचा चालक पळून गेला. दरम्यान, या अपघातप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा चालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)
वेग न कमी केल्यानेच दुर्घटना
मिरज-पंढरपूर मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर तो नुकताच दुरुस्त करण्यात आला आहे. लांडगेवाडी गावाजवळ गतिरोधक बसविण्यात आला आहे. या गतिरोधकावरही गती कमी न करता डंपर भरधाव आला. त्यामुळे गतीने गाडीचे दोन टायर फुटले. परिणामी डंपर जाग्यावर उलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.