सांगली जिल्ह्यातून विधानसभेच्या मतदार यादीवर ३८१४५ हरकती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 06:00 PM2024-08-28T18:00:56+5:302024-08-28T18:01:32+5:30
३० ऑगस्टला अंतिम होणार मतदार यादी
सांगली : जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली जात आहे. सध्या प्रारूप यादीवर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून ३८ हजार १४५ हरकती मिळाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक हरकती यादीत नावे समाविष्ट करण्याच्या आहेत. दि. ३० ऑगस्ट रोजी ही मतदार यादी अंतिम होणार आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांकडे मतदान ओळखपत्र होते. तरी देखील त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मतदारांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या २४ हजार ६५८ मतदारांनी हरकती घेत नाव समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. त्या सर्व हरकतींचा निपटारा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्याच ईव्हीएम वापरल्या जाणार असून, त्याची दुरुस्ती व तपासणी देखील सुरू आहे. दि. ३१ ऑगस्टनंतर त्या ईव्हीएम सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पोहोच केल्या जाणार आहेत. दरम्यान, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली तरी देखील नवमतदारांना पुन्हा पुरवणी यादीच्या माध्यमातून नावे समाविष्ट करण्याची संधी असणार आहे.
मतदार यादीवरील हरकती
- नावे समाविष्ट : २४,६५८
- नावे डिलीट करणे : ६,१४५
- नावात दुरुस्ती : ७,३४२
- एकूण हरकती : ३८,१४५
विधानसभेला ४० लाखांची खर्च मर्यादा
लोकसभा निवडणुकीला प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये करण्यात आली होती. तर आता विधानसभेला उभारणाऱ्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयांवरून ४० लाख रुपये करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत तेवढाच खर्च करावा लागणार आहे.
उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा
निवडणूकपूर्वी आता
लोकसभा ७० लाख ९५ लाख
विधानसभा २८ लाख ४० लाख
जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी यादी अंतिम होणार असून, त्यानंतर नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची पुरवणी यादी तयार होईल. - नीता शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सांगली.