आटपाडी तालुक्यातील ३८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:18 AM2021-06-11T04:18:56+5:302021-06-11T04:18:56+5:30
तालुक्यात गेल्या वर्षी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे, डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...
तालुक्यात गेल्या वर्षी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे, डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डाळिंबावर केलेला कोट्यवधीचा खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शासनाकडून मदत मिळेल ही आशा मात्र शेतकऱ्यांची फोल ठरली आहे. अद्याप दहा गावांतील शेतकऱ्यांना शासनाने मदत केलेली नाही. शेटफळे, तळेवाडी, तडवळे, उंबरगाव, विभूतवाडी, विठ्ठलापूर, वाक्षेवाडी, वलवण, यमाजी पाटलाची वाडी आणि झरे या गावातील तीन हजार ८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या गावातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीन कोटी चार लाख ५८ हजार ६२० रुपये निधीची गरज आहे.
चौकट
पावसाने झोडपले, शासनाने खेळविले!
गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत तीनवेळा अतिवृष्टी झाली. एकाचवेळी शंभर मि.मी पाऊस पडला. शेतीचे नुकसान झाले. दि. २९ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास मान्यता देण्यात आली. दि. १ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय झाला. १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी होती. त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. आता खरीप हंगामासाठी आर्थिक चणचण असल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी आहे.
कोट
आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडे निधीची मागणी कळविली आहे. स्मरणपत्रही दिले आहे. अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.
- सचिन मुळीक,
तहसीलदार, आटपाडी.