मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगरपालिकेचा पुणे विभागात तिसरा क्रमांक; एक कोटीचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:16 PM2024-01-17T18:16:02+5:302024-01-17T18:16:28+5:30
विटा : स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर यश संपादन केल्यानंतर आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे आयोजित मुख्यमंत्री सक्षम शहर ...
विटा : स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर यश संपादन केल्यानंतर आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे आयोजित मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगरपरिषदेने पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकाविला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विटा शहराची पहाणी केल्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर केला. विटा नगरपालिकेने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून एक कोटी रूपयांचे बक्षीस जिंकले.
राज्य शासनाने ‘ड’ वर्ग महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दि. १५ सप्टेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३ चे आयोजन केले होते. पहिल्यांदा विभागीय स्तरावर वर्गनिहाय सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या तीन शहरांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेसाठी २५ निकष ठेवण्यात आले होते. घरोघरी जाऊन १०० टक्के विलगीकरण कचरा संकलित करणे, शहरात प्लास्टिक बंदी अंमलबजावणी, प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण कार्यवाही, मालमत्ता कर संकलन, स्थावर, जंगम मालमत्तेच्या विनियोगाचे व्यवस्थापन, आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ, शहराने राबविलेली नावीन्यपूर्ण योजना, फेरीवाला विरहित क्षेत्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे यासह विविध निकषांचा या स्पर्धेत समावेश होता.
या स्पर्धेसाठी गेल्या दीड महिन्यापूर्वी विभागीय निवड समितीने पाहणी केली. त्यानंतर विविध निकषाप्रमाणे गुण देण्यात आले. या स्पर्धेत विटा नगरपालिकेने ‘अ’ व ‘ब’ वर्गामध्ये पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकाविला. मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगरपरिषदेने विभागात तिसरा क्रमांक पटकाविल्याचे वृत्त समजताच शहरात जल्लोष करण्यात आला. स्पर्धेत तिसरा क्रमांक संपादन करून विटा नगरपरिषदेने एक कोटी रूपयांचे पारितोषिक पटकाविले.
मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेसाठी विटा शहराची विभागीय स्तरावर पाहणी करण्यात आली. त्यावेळी दिलेल्या निकषाप्रमाणे गुण मिळाल्याने विटा नगरपरिषदेने या स्पर्धेत पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकाविला असून एक कोटी रूपयांचे बक्षीस मिळविले आहे. विभागीय स्तरासाठी तीनच क्रमांक काढण्यात आले होते. त्या पहिल्या तीन क्रमांकात येण्याचा बहुमान विटा नगरपालिकेला मिळाला आहे. - विक्रमसिंह पाटील, मुख्याधिकारी विटा नगरपरिषद, विटा.