वसंतदादा स्मारक भवन विकासासाठी चार कोटी ८२ लाख निधीस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:28 AM2021-04-01T04:28:08+5:302021-04-01T04:28:08+5:30
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील याबरोबरच ...
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील याबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे मागणी केली हाेती. डॉ. वसंतदादा पाटील यांना मानणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची तसेच सामान्य जनतेची सांगली व राज्यामध्ये फार मोठी संख्या आहे. वसंतदादा पाटील यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध झाल्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी गती मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, कलादालन, विस्तार कक्ष, प्रशासकीय कक्ष आदी अपूर्ण असलेल्या कामांना गती मिळणार आहे. या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सांगली महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, आतापर्यंत स्मारकासाठी जवळपास १२ कोटी खर्च झाला असून ज्या सुविधा पूर्ण झाल्या आहे, त्या जनतेसाठी खुल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने १५० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध झाली आहे.
विश्वजित कदम म्हणाले, वसंतदादा पाटील यांचे राज्यातील आणि जिल्ह्यातील सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय आदी क्षेत्रांतील कार्य हे निश्चितच प्रेरणादायी स्वरूपाचे आहे. वसंतदादांच्या स्मारकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तसेच राज्यातील नवयुवकांना, कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल.
यावेळी या बैठकीला आमदार विक्रम सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.ना. वळवी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, संपत डावखर आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.