Sangli Crime: बनावट सोने गहाण ठेवून बँकेची ४ लाखांची फसवणूक, कर्जदारासह तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:25 IST2025-03-06T13:24:52+5:302025-03-06T13:25:37+5:30
सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आयसीआयसीआय बँकेत नकली सोने गहाण ठेवून बँकेची ४ लाख ६ हजार ९८६ रूपयांची ...

Sangli Crime: बनावट सोने गहाण ठेवून बँकेची ४ लाखांची फसवणूक, कर्जदारासह तिघांवर गुन्हा दाखल
सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आयसीआयसीआय बँकेत नकली सोने गहाण ठेवून बँकेची ४ लाख ६ हजार ९८६ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कर्जदार नौशाद शेखर जमादार (रा. तुंग) आणि नकली सोन्याबाबत खरे प्रमाणपत्र देणारे नेमीनाथ धनपाल गलाडगे (रा. जैन बस्तीजवळ, कसबे डिग्रज), जगदीश आदिनाथ पाटील (रा. बागणी) या तिघांवर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तुंग येथील आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक नानासाहेब किसन सरक (रा. तुंग, मूळ रा. नांदल, ता. फलटण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नौशाद जमादार याने दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी आयसीआयसीआय बँकेत ३५ ग्रॅम सोन्याची साखळी तारण म्हणून गहाण ठेवत १ लाख २२ हजार ५८५ रूपये कर्ज घेतले. त्यानंतर दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा जमादार याने आणखी दोन सोनसाखळ्या गहाण ठेवल्या. त्या २९.९० ग्रॅम आणि ३२.८० ग्रॅम वजनाच्या होत्या. या दोन सोनसाखळ्या गहाण ठेवल्यानंतर त्याने २ लाख २३ हजार ८६ रूपये कर्ज घेतले.
दि. १७ रोजी बँकेचे लेखापरीक्षण झाले. त्यावेळी बँकेत गहाण असलेल्या सर्व सोन्याची तपासणी झाली. त्यावेळी सोनार शीतल शहा यांनी जमादार याने ठेवलेले सोने शून्य कॅरेटचे म्हणजेच खोटे असल्याचे सांगून तसे प्रमाणपत्र दिले. चौकशीत जमादार याने सोन्याचे मूल्यांकन करणारे नेमीनाथ गलाडगे, जगदीश पाटील यांच्याशी संगनमत करून सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र मिळवले. ते बँकेत सादर करून एकूण ३ लाख ४५ हजार ८८६ रूपये कर्ज व त्यावरील व्याज ६१ हजार १०० रूपये अशी बँकेची ४ लाख ६ हजार ९८६ रूपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल केला.