सांगलीतील ४० टक्के जलवाहिन्या जीर्ण, यंत्रणेत बदलाची गरज
By अविनाश कोळी | Published: July 17, 2024 11:54 PM2024-07-17T23:54:26+5:302024-07-17T23:54:40+5:30
वारणा योजनेत नव्या पाईपलाईनचा समावेश
सांगली : शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेत अद्याप ४० टक्के जलवाहिन्या या पन्नास वर्षापूर्वीच्या आहे. त्या जीर्ण झाल्या असून त्या बदलल्यास पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम होऊ शकते. सातत्याने होत असलेले पाणी गळतीचे प्रकार रोखण्यासाठी जलवाहिन्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे.
गावठाणात बहुतांशी जुन्या लाईन आहेत. काहीठिकाणी १९७०च्या तर काहीठिकाणी १९५०च्या जलवाहिन्या आहेत. जुन्या जलवाहिन्यांमुळे वारंवार पाणीगळतीच्या समस्येचा सामना महापालिकेला करावा लागतो. दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ येते. या सर्व दुष्टचक्रातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेला ही यंत्रणा बदलण्याची गरज आहे. सांगलीतील माळबंगला येथील ५६ एमएलडीचा जुना प्रकल्पही कालबाह्य झाल्याने तोही बदलावा लागेल. यातून शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.
९०० किलोमीटरचे अंतर
सांगली, कुपवाड शहरातील जलवाहिन्या एकूण ९०० किलोमीटर अंतरात विस्तारल्या आहेत. त्यातील ४०० ते ४५० किलोमीटर अंतराच्या पाईपलाईन्स या पन्नास वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. त्या बदलण्याची आवश्यकता आहे.
वारणा योजनेत समावेश
वारणा उद्भव योजनेचा २९० कोटीचा प्रस्ताव सध्या शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या योजनेतच जुन्या पाईपलाईन बदलणे, नव्या १५ टाक्या बांधणे तसेच अन्य कामांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या मंजुरीची महापालिकेला प्रतीक्षा आहे.
...तर पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम
जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्यास पाणीपुरवठा यंत्रणेचे सक्षमीकरण होणार आहे. पाणी गळतीचे प्रकार अत्यल्प होतील. विस्तारीत भागात आता चांगल्या जलवाहिन्या बसविण्यात आल्यामुळे गळतीचे प्रकार त्याठिकाणी दिसत नाहीत.
गावठाणातच अधिक समस्या
सांगलीच्या गावभाग, खणभाग, फौजदार गल्ली, स्टँड परिसर, राजवाडा अशा गावठाणातच जुन्या जलवाहिन्या अधिक आहेत. त्यामुळे त्यांच्या गळतीनंतर पाण्याच्या समस्येला याच भागाला अनेकदा सामोरे जावे लागते. नव्या योजनेनंतर गावठाणातील समस्या दूर होऊ शकते.