जतमधील मरिआई कुटुबांवरील बहिष्कार मागे ४० वर्षांनंतर न्याय : अंनिस व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:16 PM2018-09-13T23:16:09+5:302018-09-13T23:17:56+5:30

जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला.

40 years after the boycott of the Mariei families in the city, Justice: Anis and Nomadic Community Organization's efforts to succeed | जतमधील मरिआई कुटुबांवरील बहिष्कार मागे ४० वर्षांनंतर न्याय : अंनिस व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला यश

जतमधील मरिआई कुटुबांवरील बहिष्कार मागे ४० वर्षांनंतर न्याय : अंनिस व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला यश

googlenewsNext

सांगली : जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला. याप्रकरणी कोळी कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेची मदत घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे धाव घेतली होती. पोलिसांनी जातपंचायतीला सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखविला होता.

मारुती कोळी (रा. जत) यांना त्यांच्या मरिआई (कडकलक्ष्मी) समाजाने तब्बल ४० वर्षे बहिष्कृत केले होते.अंनिस व भटक्या समाज संघटनेच्या प्रयत्नांमुळे जत पोलिसांनी जातपंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखवला. तेव्हा पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारुती यांना समाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. पंचांच्याहस्ते पान-सुपारी देऊन मारुती कोळी यांच्या कुटुंबास मरिआई समाजात ४० वर्षांनी घेतले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

मारुती कोळी जतमधील स्टिल कॉलनीत बुद्धवा व नागव्वा या दोन पत्नींसह मुलगी शीतल, सोनल, मुले राहुल, बालाप्पा, भीमाण्णा यांच्यासह राहतात. मरिआईचा (कडकलक्ष्मी) गाडा घेऊन गावोगावी देवीचा महिमा सांगून अंगावर आसूडाचे फटके मारुन धान्य व पैसे गोळा करतात. लग्नापूर्वी त्यांची पहिली पत्नी बुद्धवा यांच्या वडिलांना रिवाजाप्रमाणे पाच हजारांची दक्षिणा दिली होती; पण जात पंचायतीस काही दिले नाही; तसेच लग्न करण्याची परवानगीही घेतली नव्हती. त्यामुळे पंचायतीने त्यांना एक लाखाचा दंड केला. हा दंड त्यांनी भरलाही, पण पंचायतीने आणखी दोन लाखाच्या दंडाची मागणी केली. कोळी यांनी पैसे नसल्याचे सांगताच, पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. तो ४० वर्षे कायम होता.

कोळी यांनी या अन्यायाविरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेशी संपर्क साधला. अंनिसने त्यांना घेऊन जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार दिली. त्यांनी जत पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तासीलदार यांनी जात पंचायतीच्या पंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कार कायद्याची माहिती दिली.

या कायद्याचा बडगा दाखविताच पंचांनीही नरमाईची भूमिका घेत बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. कोळी यांचा पंचांच्याहस्ते पानसुपारी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांचा ४० वर्षांचा वनवास गुरुवारी संपला. भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे विकास मोरे, गणेश निकम, नितीन मोरे, अतुल कांबळे, दयानंद मोरे, हवालदार विजय वीर, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, कार्यवाह राहुल थोरात यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन कुटुंबाला न्याय मिळाला.

जात पंचायत नरमली
सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही कारणाने स्वजातीतून बहिष्कृत करता येत नाही. पोलिसांनी जात पंचायतीच्या पंचांना या कायद्याचा बडगा दाखविताच त्यांनी नरमाईची भूमिका घेऊन मारूती कोळी यांच्या कुटुंबावरील बहिष्कार उठवला. दोन्ही मुलींची लग्ने समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पार पाडू, कोळी यांच्या कुटुंबास समाजाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात योग्य तो मान देऊ, असेही पंचांनी लेखी दिले.

 

 


 

 

Web Title: 40 years after the boycott of the Mariei families in the city, Justice: Anis and Nomadic Community Organization's efforts to succeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.