जादा परताव्याचे आमिष: सांगलीत व्यावसायिकाची ४१ लाखांची फसवणूक
By शीतल पाटील | Published: September 8, 2023 06:28 PM2023-09-08T18:28:41+5:302023-09-08T18:29:36+5:30
दोघांवर गुन्हा दाखल
सांगली : जादा परताव्याचे आमिष दाखवून कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी येथील एका व्यावसायिकाची ४१ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप तुकाराम नवगिरे (रा. पिपळखुंटे, ता. माढा, जि. सोलापूर ) आणि पावबा रमण कोळी (रा. सह्याद्रीनगर, विश्रामबाग, सांगली ) अशी संशयीतांची नावे आहेत.
याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे व्यावसायिक सचिन तमन्ना रामगोंडावरु यांनी फिर्याद दिली आहे. फसवणूकीचा प्रकार १५ सप्टेंबर २०२१ ते २१ ऑक्टोबर २०२१ रोजी घडला. दोघा संशयीतांनी रामगोंडावरु यास सांगलीतील आमराई परिसरात बोलवून घेतले. तेथे संशयीत संदिप नवगिरे याने ॲक्सीस ग्रो एल एल पी या शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिग करणाऱ्या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळत असल्याचे सांगितले. कमी कालावधीत चांगला अर्थिक फायदा होत असल्याचे पाहून फिर्यादी यांनी सदर कंपनीत पैसे गुंतविण्यास संमती दर्शवली.
दरम्यान फिर्यादी रामगोंडावरु यांनी संशयीतांनी सांगितल्यानुसार अकलूज येथील ॲक्सीस बॅँकेच्या शाखेतील संबंधित खात्यात एक कोटी रक्कम गुंतविली. काही दिवसांनी संशयीतांनी फिर्यादीस कंपनीच्या करंट तसेच स्वत:च्या सेव्हिंग खात्यावरुन फिर्यादीच्या सांगली येथील बॅँक खात्यावर ५८ लाख ९५ हजार रुपये वर्ग केले. मात्र त्यानंतर कोणतीच रक्कम फिर्यादीस परत मिळाली नाही. याप्रकरणी फिर्यादी रामगोंडावरु यांनी वारंवार संशयीतांकडे पाठपुरावा केला. विश्वास संपादन करण्यासाठी संशयीतांनी फिर्यादीस कोरे धनादेश दिले. परंतु त्यानंतरही रक्कम परत दिली नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी रामगोंडावरु यांनी दोघा संशयीतांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.