Sangli Flood: अतिवृष्टी, पुरामुळे ४,१३१ हेक्टर बाधित, शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:49 PM2024-07-30T17:49:09+5:302024-07-30T17:49:30+5:30
प्रशासनाकडून पंचनामे सुरू
सांगली : मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील आठ हजार ५४४ शेतकऱ्यांचे चार हजार १३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये फळपिक, ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचा शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसला आहे.
कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरूच राहिल्याने धरणातून पाणी सोडले. कृष्णा आणि वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील चार हजार १३१ हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. शेतीमधील ऊस, केळी, हळद, सोयाबीन आदी पिकांत पावसाचे पाणी साचून राहिले आहे. याचा शेतकरी वर्गाला फार मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकविलेल्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे.
वारणा नदीकाठच्या शिराळा तालुक्यातील सर्वाधिक पिके पाण्याखाली गेली आहेत. तीस गावातील पाच हजार ३७८ शेतकऱ्यांचे दोन हजार ९१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा नजरअंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. वाळवा तालुक्यातील एक हजार ६०६ हेक्टर आणि मिरज तालुक्यातील कृष्णा आणि वारणा काठावरील एक हजार ५६० हेक्टरवरील शेतीपिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा ऊस, केळी, हळद आदी पिकांना बसला आहे. यंदा शेतकऱ्यांनी आडसाली उसाची लावण मोठ्या प्रमाणात केली आहे.
मात्र संततधार पावसाचा मोठा फटका या कोवळ्या आडसाली उसाला बसला आहे. अनेक ठिकाणी पुन्हा उसाची लागण करावी लागणार आहे. उसाप्रमाणेच हळदीच्या पिकालाही फटका बसला आहे. नदीकाठी हळद पावसाच्या पाण्यात बुडाली आहे. भाजीपाला, टोमॅटो, काढता येत नसल्याने लाखो रुपयांची पीक शेतातच कुजली आहेत. नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे त्वरित करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तीन तालुक्यांना सर्वाधिक फटका
तालुका - बाधित शेतकरी - गाव - क्षेत्र (हेक्टर)
मिरज - १५६० - २१ - ६६७
वाळवा - १६०६ - २८ - ५४६
शिराळा - ५३७८ - ३० - २९१८
एकूण - ८५४४ - ७९ - ४१३१.०५
प्रशासनाकडून पंचनामे सुरू
राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकासह घरांची पडझडाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.
या पिकांचे सर्वाधिक नुकसान
मिरज, वाळवा, शिराळा तालुक्यातील सोयाबीन, भाजीपाला, भूईमूग, ऊस, भात, मका, हळद, पपई, केळी, पेरू या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.