सांगली, मिरज मतदार संघातील ४२८२ मतदार छायाचित्राविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:00+5:302021-07-02T04:19:00+5:30
सांगली : छायाचित्रे न दिलेल्या सांगली, मिरज विधानसभा मतदार संघातील ४ हजार २८२ मतदारांची शोधमाेहीम सध्या सुरु असून, येत्या ...
सांगली : छायाचित्रे न दिलेल्या सांगली, मिरज विधानसभा मतदार संघातील ४ हजार २८२ मतदारांची शोधमाेहीम सध्या सुरु असून, येत्या ५ जुलैपर्यंत त्यांची छायाचित्रे न प्राप्त झाल्यास मतदार यादीतून त्यांची नावे वगळण्याची शक्यता आहे. तरीही जिल्ह्यात शंभर टक्के छायाचित्र संकलन मोहीम यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभाग प्रयत्न करत आहे.
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र प्राप्त करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. काही मतदार दिलेल्या पत्त्यावर कायमस्वरुपी राहात नसल्याचे दिसून आले आहे. अशावेळी संंबंधितांची नावे यादीतून वगळण्याची कारवाई होऊ शकते. जिल्ह्यातील अशा छायाचित्र नसलेल्या व दिलेल्या पत्त्यावर आढळत नसलेल्या मतदारांची शोध मोहीम सुरु असून, येत्या ५ जुलैपर्यंत त्यासाठी मुदत आहे. सध्या जिल्ह्यात सांगली व मिरज विधानसभा मतदार संघातील विशेषत: दोन्ही शहरांतील अधिक लोक छायाचित्र न देणाऱ्यांच्या यादीत आहेत. ग्रामीण भागात शंभर टक्के छायाचित्र संकलन झाले आहे. आठ विधानसभा मतदार संघांपैकी सहा मतदार संघांमधील काम पूर्ण झाली आहेत. त्यामुळे छायाचित्र नसलेल्या या दोन मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्रे घेत आहेत.
चौकट
जिल्ह्यातील एकूण मतदार
२३,९०,०००
पुरुष मतदार १२,३१,०००
स्त्री मतदार ११,५९,०००
छायाचित्रे नसलेले ४,२००
छायाचित्रे असलेले २३,८५,७१८
चौकट
विधानसभा एकूण मतदार छायाचित्र नसलेले
सांगली ३,२१,६८९ १८९१
मिरज ३,१८,९५२ १३९१
चौकट
पाच जुलैपर्यंत अंतिम मुदत
लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० व मतदार नोंदणी अधिनियमाच्या १९६०मधील तदतूद व भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येते. यासाठी ५ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यामुळे अशा मतदारांची छायाचित्र संकलित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.
चौकट
मतदार यादीतून नाव वगळण्याची कारवाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित मतदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे द्यावेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातही याबाबत संपर्क साधता येतो.
मतदार यादीतील पत्ता व सध्याचा पत्ता बदलला असेल तर छायाचित्र जमा केल्याबाबत खात्री करुन संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
कोट
सांगली व मिरज विधानसभा मतदार संघातीलच काही मतदारांची छायाचित्रे मिळालेली नाहीत. उर्वरित सर्व मतदार संघातील याद्या शंभर टक्के छायाचित्रांसह अद्ययावत आहेत. जिल्ह्यातील ९९.८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत छायाचित्रे मिळवून शंभर टक्के मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- एम. बी. बोरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी