सांगली, मिरज शहरात ४३ रिक्षा केल्या जप्त
By admin | Published: November 6, 2015 11:32 PM2015-11-06T23:32:59+5:302015-11-06T23:36:39+5:30
शंभरहून अधिक रिक्षांची तपासणी
सांगली : नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सुरु केलेली तपासणी मोहीम अद्याप सुरूच आहे. शुक्रवारी सांगली, मिरजेत शंभरहून अधिक रिक्षांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोषी आढळलेल्या ४३ रिक्षा जप्त केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात ही तपासणी मोहीम सुरु केली आहे. रिक्षाचा परवाना नसणे, पासिंग मुदतीत न करणे, गणवेश नसणे, बॅचबिल्ला न लावणे आदी बाबी तपासल्या जात आहेत. यामध्ये अनेक रिक्षाचालक नियमबाह्य व्यवसाय करीत असल्याचे आढळून येत आहे. तपासणी मोहीम १६ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
मुदत ओलांडून गेलेले अडीच हजार रिक्षा परवाने नूतनीकरणास मुदत देऊनही रिक्षाचालकांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे परिवहन आयुक्तांच्या आदेशाने तपासणी मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत सत्तरहून अधिक रिक्षा जप्त केल्या आहेत, तर दीडशे रिक्षांना दंडात्मक कारवाई का करु नये?, अशी नोटीस दिली आहे. (प्रतिनिधी)