पाण्यासाठी ४३ गावांचा टाहो...
By Admin | Published: March 13, 2017 10:59 PM2017-03-13T22:59:40+5:302017-03-13T22:59:40+5:30
तासगाव-कवठेमहांकाळवर पाणी संकट : प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद
अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ --सुमारे १३ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी महावितरणने प्रादेशिक योजनेचे पाचव्या मैलावरील जलशुद्धीकरण केंद्र आणि भिलवडी स्टेशन येथील जॅकवेलचा विद्युतपुरवठा शु्क्रवारी खंडित केला. यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद झाली आहे. दोन तालुक्यातील ४३ गावातील लोकांना कुणी पाणी देता का पाणी, अशी मागणी करत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या मणेराजुरी प्रादेशिक योजना, कवठेमहांकाळ-विसापूर प्रादेशिक योजना आणि येळावी प्रादेशिक योजनेद्वारे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ४३ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेल्या पंधरा वर्षापासून केला जात आहे. यामध्ये मणेराजुरी प्रादेशिक योजनेत १८ गावे, कवठेमहांकाळ-विसापूर प्रादेशिक योजनेत १६ गावे आणि येळावी प्रादेशिक योजनेत नऊ गावांचा समावेश आहे.४३ गावांकडून जमा होणाऱ्या पाणीपट्टीची रक्कम १ कोटी ५0 लाख रुपये आहे; तर योजना चालविण्यासाठी येणारे वीजबिल, कामगार पगार व देखभाल दुरुस्ती यावर होणारा खर्च ४ कोटी २0 लाख एवढा आहे. यामुळे योजना चालू ठेवण्यासाठी दरवर्षी जवळपास २ कोटी ७५ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी बंद होणे आता नवीन राहिले नाही. गेल्या वर्षभरापासून अशीच परिस्थीती राहिली आहे. अकरा महिन्यांपैकी तीन महिनेच ही योजना चालू आहे. उर्वरित आठ महिने पाणीपुरवठा बंदच आहे. शुक्रवारी परत एकदा महावितरणने पाचव्या मैलावरील जलशुद्धीकरण केंद्र आणि भिलवडी स्टेशन येथील जॅकवेलचा विद्युतपुरवठा खंडीत केला. यामुळे दोन्ही तालुक्यातील ४३ गावातील पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.
प्रादेशिक योजनेचा पाणीपुरवठा बंद झालेली गावे
मणेराजुरी प्रादेशिक योजना-
मणेराजुरी, योगेवाडी, धुळगाव, भैरववाडी, चिंचणी,
उपळावी, कुमठे, सावर्डे, खुसगाव, कौलगे, वाघापूर, बस्तवडे, डोर्ली, पुणदी, बलगवडे, लोढे, मतकुणकी,
नागाव (कवठे)
येळावी प्रादेशिक योजना -
येळावी, नेहरूनगर, निमणी, नागाव, बेंद्री,
भिलवडी स्टेशन हजारवाडी,
बुरुंगवाडी, जुळेवाडी.
कवठेमहांकाळ-विसापूर प्रादेशिक योजना -
कवठेमहांकाळ, शेळकेवाडी, आगळगाव,
जाखापूर, जाधववाडी, शिरढोण, लांडगेवाडी, मळणगाव, जायगव्हाण, देशिंग, विठूरायाचीवाडी
विसापूर, तुरची, ढवळी, गोटेवाडी, वंजारवाडी.