सांगली जिल्ह्यात ‘स्मार्ट पीएचसी’च्या ४४ कामांना ठेकेदारांमुळे ब्रेक, अपूर्ण कामांमुळे रुग्णांचे हाल
By अशोक डोंबाळे | Published: September 21, 2023 05:42 PM2023-09-21T17:42:43+5:302023-09-21T17:43:12+5:30
जिल्हा परिषद कारवाई करणार
अशोक डोंबाळे
सांगली : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा आणि सुविधांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेने ४७ आरोग्य केंद्रांचा स्मार्ट पीएचसीमधून विकास सुरू आहे. जानेवारीत काम सुरू करण्याचे आदेश देऊनही ४४ ठेकेदारांनी कामे ठप्प ठेवली आहेत. ठेकेदारांच्या या कारभारामुळे आरोग्य केंद्रात रुग्णांच्या उपचारासाठी जागा नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहे. म्हणून जिल्हा परिषदेने कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर बुधवारी कारवाईचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपचारांसाठी आधार आहे. म्हणून तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्मार्ट पीएसी ही योजना राबविली होती.
या योजनेसाठी ६४ आरोग्य केंद्रापैकी ४७ आरोग्य केंद्राची निवड केली. या आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधांसाठी २७ काेटी रुपयांच्या निधीची तरतूदही केली आहे. जून २०२२ मध्ये ४७ कामांना प्रशासकीय मजुरी दिली होती. ठेकेदारांना कामे सुरू करण्याचे आदेश जानेवारी २०२३ मध्ये दिले आहेत. स्मार्ट पीएसीची कामे सुरू होऊन साडेआठ महिने झाले आहेत. तरीही कामे पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे सध्या हाल चालू आहे. ४७ स्मार्ट पीएसी पैकी वायफळे (ता. तासगाव), लेंगरे (ता. खानापूर) आणि बोरगाव (ता. वाळवा) येथील कामे पूर्ण आहेत. उर्वरित ४४ आरोग्य केंद्राची कामे थांबल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करतानाच अधिकाऱ्यांना ठेकेदारावर कारवाईच्या सूचना दिल्या.
अशी आहेत स्मार्ट पीएचसी
आरोग्य केंद्राची अत्याधुनिक इमारत असेल. यामध्ये शस्त्रक्रीया विभाग, बाह्यरुग्ण, अंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध निर्माण, प्रसुती, लसीकरण विभाग स्वतंत्र केले आहेत. रुग्ण समुपदेशन हाॅल, आशा, आरोग्य सेविकांसाठी अत्याधुनिक काॅन्फरन्स हाॅल आहे.
आठ स्मार्ट पीएचसी कामे पूर्णत: ठप्प
दिघंची (ता. आटपाडी), भोसे (ता. मिरज), संख (ता. जत) सह आठ स्मार्ट पीएसींच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत: ठप्प झाले आहे. याबद्दल संबंधित ठेकेदारांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत, असेही जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.
कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पूर्णता ठप्प असलेल्या स्मार्ट पीएचसीच्या कामांची पाहणी करण्याची सूचना दिली आहे. तसेच अपूर्ण कामे ठेवणाऱ्या ठेकेदारांची लवकरच बैठक घेऊन स्मार्ट पीएचसीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. - तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.