अनाथ ४५० बालिकांना मिळाले सांगलीत हक्काचे घर..!

By Admin | Published: January 2, 2017 11:28 PM2017-01-02T23:28:30+5:302017-01-02T23:28:30+5:30

मायेचा आधार : भारतीय समाज सेवा केंद्र, वेलणकर अनाथाश्रमने संगोपनातून जोपासली माणुसकी

450 children of orphan got possession of Sangli's house ..! | अनाथ ४५० बालिकांना मिळाले सांगलीत हक्काचे घर..!

अनाथ ४५० बालिकांना मिळाले सांगलीत हक्काचे घर..!

googlenewsNext

सचिन लाड ल्ल सांगली
कुणी मुलगी झाली म्हणून झिडकारले... कुणी अनैतिक संबंधातून जन्मली म्हणून टाकून दिले... कुणी अपंग आहे म्हणून सोडली... कुणी सांभाळण्याची ऐपत नाही म्हणून जबाबदारी झटकली... अशा अनेक कारणांनी माता-पिता असूनही अनेकजणी ‘नकुशी’ ठरलेल्या. माता-पित्याच्या अकाली मृत्यूमुळेही अनेकींच्या नशिबी ‘अनाथ’पणाचं जगणं. या ना त्या कारणांमुळे आभाळाच्या छताखाली आलेल्या मुलींना सांगलीतील भारतीय समाज सेवा केंद्र व उद्योगरत्न वि. रा. वेलणकर अनाथाश्रमने मायेचा आधार दिला आहे.
भारतीय समाज सेवा केंद्राने तर गेल्या १६ वर्षांत ४५० अनाथ मुलींना दत्तक योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर मिळवून दिले. वेलणकर अनाथाश्रम तर अनाथ मुलींच्या पालनपोषणाबरोबर त्यांची शैक्षणिक जबाबदारीही पार पाडत आहे.
मुख्य बसस्थानकाजवळ वेलणकर मुलींचे अनाथाश्रम आहे. सहा ते अठरा वयोगटातील अनाथ मुलींचा येथे सांभाळ केला जातो. मुलींचे राहणे, नाष्टा, जेवण यासह त्यांना शिक्षणही दिले जाते. ८५ क्षमता असलेल्या अनाथाश्रमात सध्या सहा ते १३ वयोगटातील २१, तर १४ ते १८ वयोगटातील १९ मुली आहेत. पूर्वी दीडशे मुली होत्या. पण गेल्या चार-पाच वर्षात हे प्रमाण घटले आहे. या मुली येथे येतात कशा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बहुतांश मुली परराज्यातील आहेत. त्यांना लहान असतानाच बेवारस स्थितीत सोडले जाते. पोलिस मुलींना ताब्यात घेतात. त्यांची चौकशी करतात; मात्र त्यांना मराठी बोलता येत नाही. त्या रडत असतात. शेवटी बाल न्यायाधिकरण समितीच्या आदेशाने मुलींना वेलणकर अनाथाश्रमात सोडले जाते. अनाथाश्रमातील महिला कर्मचारीच मुलींच्या आई बनतात. पंधरा-वीस दिवस मुलींसोबत अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांना वागावे लागते. त्यानंतर या मुली चांगल्याप्रकारे रुळतात. जसं वय वाढलं तशी त्यांना आश्रमाची सवय लागते. वाढत्या वयामुळे त्यांना भूतकाळाचा विसर पडतो. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली की, पुढे मुलींचे राज्यातील कोणत्याही आश्रमशाळेत पुनर्वसन केले जाते.
माधवनगर रस्त्यावरील भारतीय समाज सेंवा केंद्रातही शून्य ते सहा वर्षे वयोगटातील अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला जातो. गेल्या १६ वर्षांपासून संस्थेचे हे कार्य सुरू आहे. ५० मुलांचा सांभाळ करण्याची क्षमता असलेल्या या केंद्रात सध्या केवळ १५ मुले आहेत. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात कुठेही नुकतेच जन्मलेले अर्भक सापडले की, त्याचा सांभाळ करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे भारतीय समाज सेवा केंद्र आहे. येथे दाखल होणाऱ्यांपैकी ९५ टक्के मुलीच असतात.
प्रमाण घटले : शून्यावर आले!
मुलींना झिडकारुन त्यांना बेवारस स्थितीत टाकून देण्याचे प्रमाण अत्यंत कमी आले असल्याचे भारतीय समाज सेवा केंद्रात सध्या दाखल असलेल्या मुलींच्या आकडेवारीवरुन दिसून येते. आॅगस्ट २०१६ मध्ये तासगाव येथे नवजात मुलीला शेतात फेकून दिले होते. पोलिसांमार्फत ही मुलगी केंद्रात दाखल झाली. तेव्हापासून एकही अनाथ मुलगी केंद्रात दाखल झाली नाही. सध्या १५ पैकी चार मुलींना दत्तक घेतले आहे. त्यामुळे केंद्रात अकराच मुले-मुली राहणार आहेत. वैद्यकीय सोयी-सुविधांची उपलब्धता, मुलीच्या जन्माबाबत प्रबोधन, समाजजागृती यामुळे मुलींना जन्मताच बेवारस स्थितीत टाकून देण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून येते.
बेवारस मुलगी आली तर पोलिसांच्या मदतीने तिच्या पालकांचा शोध आम्ही घेतो. अनेक प्रकरणात मुलींचे पालक मिळाले आहेत, पण ज्या मुलींचे पालक मिळाले नाहीत, त्यांना नवीन पालक देण्याची जबाबदारी केंद्र शंभर टक्के पार पाडते. दत्तक योजनेतून ज्या मुलींना हक्काचे घर मिळाले आहे, त्यांचा व्यवस्थित सांभाळ सुरू आहे का नाही, याचा आढावा घेत असतो.
- सुप्रिया वाटवे, निरीक्षक, भारतीय समाज सेवा केंद्र, सांगली.

अनाथ मुली दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. पूर्वी दीडशे मुली असत. आता ही संख्या केवळ २१ वर आली आहे. ज्या मुली आहेत, त्यांचे चांगल्याप्रकारे पालनपोषण केले जात आहे. घरच्या मुलींप्रमाणे त्यांना सांभाळ केला जातो. पण ती अठरा वर्षांची झाली की तिला आश्रमशाळेत सोडताना खूप दु:ख होते.
- अनुराधा डुबल, अधीक्षिका, उद्योगरत्न वि. रा. वेलणकर अनाथाश्रम, सांगली.

Web Title: 450 children of orphan got possession of Sangli's house ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.