जिल्ह्याला लसींचे ४५ हजार नवे डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:17+5:302021-04-21T04:27:17+5:30
सांगली : जिल्हाभरात मंगळवारी १० हजार ७७२ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यापैकी महापालिका क्षेत्रात फक्त १ हजार ३७४ ...
सांगली : जिल्हाभरात मंगळवारी १० हजार ७७२ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यापैकी महापालिका क्षेत्रात फक्त १ हजार ३७४ जणांना लस मिळाली. लस संपल्याने दुपारनंतर अनेक केंद्रांवर लसीकरण थांबले. संध्याकाळी ४५ हजार डोस नव्याने मिळाले.
लस आल्याने बुधवारी पुन्हा लसीकरण गतीने सुरू राहणार आहे. रविवारी दुपारी लसींचे ३१ हजार डोस मिळाले होते. त्यातून सोमवारी व मंगळवारी लसीकरण सुरू राहिले. आजवर ४ लाख ३० हजार ७५० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दुसऱ्या डोससाठीदेखील लाभार्थी येत असल्याने गर्दी होत आहे, लसीची मागणी वाढली आहे. पुरवठा मात्र विस्कळीत आहे.
मंगळवारी जिल्हाभरातील ३७७ केंद्रांपैकी बहुतांश लसीकरण केंद्रांवर काम थांबले. प्राथमिक आरोग्य केंद्रांनी उरल्यासुरल्या डोसमधून लाभार्थींचे लसीकरण केले. दुपारनंतर लाभार्थ्यांना परत जावे लागले. संध्याकाळी जिल्हा परिषदेला नव्याने ४५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला. आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत तीन आरोग्य केंद्रांना लस वितरित केली. महापालिकेला बुधवारी सकाळी देण्यात येणार आहे. जिल्हाभरातील आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालयांनाही सकाळी सातपासूनच वितरण केले जाणार आहे. लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले की, ४५ हजार डोस मिळाल्याने दोन-तीन दिवस लसीकरण अखंडित चालू शकेल.
चौकट
मंगळवारचे लसीकरण असे :
ग्रामीण भागात - ८१००
निमशहरी भागात - १२९८
महापालिका क्षेत्रात - १३७४
एकूण - १०,७७२
आजवरचे लसीकरण - ४ लाख ३० हजार ७५०.