सांगली जिल्हा नियोजनच्या ४७१ कोटींच्या आराखड्यास मंजुरी
By अशोक डोंबाळे | Published: January 10, 2024 06:21 PM2024-01-10T18:21:57+5:302024-01-10T18:22:28+5:30
दीडशे कोटीची जादा मागणी : शिक्षण, आरोग्य, महावितरणसाठी निधीचा टक्का वाढविला
सांगली : शिक्षण, आरोग्य आणि महावितरणसाठी मूलभूत सुविधा वाढविण्यासाठी जिल्हा नियोजनसाठी १५० कोटी रुपयांचा जादा निधी शासनाकडे मागण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ४७१ कोटी १ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास बुधवारी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनची बैठक झाली. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, विश्वजीत कदम, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.
सुरेश खाडे म्हणाले, २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून ४०५ कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्यापैकी २८४ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, २१३ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. ४५ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही १५ दिवसांत पूर्ण करावी व मार्च २०२४ अखेर निधी खर्च करावा. याचे कटाक्षाने पालन करावे. कोणताही निधी परत जाणार नाही, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत.