केवायसीच्या बहाण्याने लांबवलेले ४८ हजार तक्रारदारास परत, सांगली सायबर पोलिसांचे यश
By शरद जाधव | Published: October 11, 2023 07:25 PM2023-10-11T19:25:19+5:302023-10-11T19:32:31+5:30
अनोळखी कॉल्स'ला प्रतिसाद देवू नका
सांगली : क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने मोबाइलवर लिंक पाठवून त्याव्दारे बँक खात्यातील लांबविण्यात आलेले ४८ हजार रुपये सायबर पोलिसांनी तक्रारदारास परत मिळवून दिले. तात्काळ करण्यात आलेली तक्रार आणि त्यावर सायबर पोलिसांनीही काम करत तात्काळ ही रक्कम परत मिळविण्यात यश आले.
आष्टा (ता.वाळवा) येथील मनोहर देशमुख यांना अनोळखी व्यक्तीने कॉल करून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले होते. यानंतर आपले क्रेडीट कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी मोबाइलवर पाठविण्यात आलेली लिंक ओपक करून त्यावर माहिती भरण्यास सांगितले होते. यावर विश्वास ठेवून देशमुख यांनी माहिती भरली मात्र, यानंतर त्यांच्या खात्यातून ४८ हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली होती.
फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच देशमुख यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबरच्या पथकाने याचा तपास सुरू केला असता, एका ऑनलाईन खरेदीच्या संकेतस्थळाने ही रक्कम काढून घेतल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत ही रक्कम तात्काळ परत मिळवली. सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
अनोळखी कॉल्स'ला प्रतिसाद देवू नका
अनोळखी क्रमांकावरून कॉल्स आल्यास त्यांना प्रतिसाद देवू नये, आपली बँक खात्यासंबंधीची माहिती कोणालाही शेअर करू नये, फसव्या लिंक कधीही ओपन करू नयेत असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.