सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही
By अशोक डोंबाळे | Updated: March 1, 2025 14:26 IST2025-03-01T14:25:29+5:302025-03-01T14:26:24+5:30
'खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळणार'

सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील गेल्या १० वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील २१७ शाखांमधील एक लाख ९१ हजारांवर खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा केली आहे. या खात्यातील रकमेत बँकेतील कर्मचाऱ्यांकडूनच गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखाद्या बँकेतील खात्यावर सलग १० वर्षे एकदाही उलाढाल झाली नसेल ते खाते नॉन-वर्किंग होते. त्या खात्यावर असलेली शिल्लक रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागते. जिल्ह्यातील सर्व शाखांतील एक लाख ९१ हजार १३२ खातेदारांची ४९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपये विविध कारणांनी बंद असलेल्या खात्यांमध्ये होती. ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याबाबत जिल्हा बँकेला सूचना करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ७५ हजार ७५९ खातेदारांचे २० कोटी ४५ लाख आठ हजार, तर दुसऱ्या टप्प्यात एक लाख १५ हजार ३७३ खातेदारांची २९ कोटी चार लाख १९ हजार रुपये इतकी रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली.
बंद खातेदारांच्या वारसांनी आवश्यक पुरावे असलेली कागदपत्रे आणून त्या खात्यावरील रक्कम काढून देण्याबाबत बँकेने ग्राहकांना कळविले होते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने खातेदारांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागली होती. संबंधित ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता करून बंद खात्यातील रक्कम काढून घ्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले.
खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळतील : शिवाजीराव वाघ
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बंद खात्यातील खातेदारांचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे जमा केले तरी ते संबंधित खातेदाराने अथवा त्यांच्या वारसांनी पुरावे दिल्यानंतर रक्कम परत मिळू शकते. ज्या बंद खात्यावरील पैसे गेले आहेत, त्या खातेदार आणि त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे जिल्हा बँकेला देण्याची गरज आहे. त्यानंतर त्यांची रक्कम संबंधित खातेदारांना दिली जाईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.