ब्रह्मनाळमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 07:18 PM2019-08-08T19:18:23+5:302019-08-08T19:18:32+5:30
ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे होडी उलटून मृत झालेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली.
सांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे होडी उलटून मृत झालेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली. त्यांनी याबाबतची माहिती भाजप पदाधिकाºयांना दिली.
गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस सांगलीतील पूरपरिस्थिती पाहण्यासाठी आले होते. खराब हवामानामुळे त्यांना लष्कराने हेलिकॉप्टर न उतरविता परत जाण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खाली न उतरताच परतले. जाताना त्यांनी मोबाईलवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी संपर्क साधला. ब्रह्मनाळ येथील घटनेची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत देण्यात येईल, असे सांगितले. याबाबत त्यांनी प्रशासनासह संबंधितांना माहिती देण्याबाबत सांगितले. या घटनेबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला. सांगलीतील पूरस्थितीबाबत शासन, प्रशासन सर्व ते प्रयत्न ताकदीने करेल. जनतेला संकटातून बाहेर काढण्यात येईल, असा संदेश त्यांनी दिल्याचे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.