हिमस्खलनातून सुटका केलेले ५ जवान मृत
By admin | Published: January 30, 2017 11:29 PM2017-01-30T23:29:04+5:302017-01-30T23:29:04+5:30
सातारा, सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एक
श्रीनगर : मच्छील सेक्टरमध्ये बर्फाखालून सुटका करण्यात आलेल्या पाच जवानांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे. गणेश ढवळे (वय ३०, रा. आसरे आंबेदरावाडी ता. वाई, जि, सातारा) , रामचंद्र माने (वय ३४, कवठेमहांकाळ, जि. सांगली) आणि बालाजी अंभोरे (वय २६, जि. परभणी) अशी त्यांची नावे आहेत.
बर्फाखाली अडकलेल्या जवानांची त्याच दिवशी सुटका करण्यात आली. तथापि, खराब हवामानामुळे त्यांना श्रीनगरला हलविता आले नाही वा वैद्यकीय मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविता आली नाही. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. आजही हवामान ठीक नव्हते. मात्र, लष्करी वैमानिकांनी मोठ्या हिमतीने जखमी जवानांना श्रीनगरला हलविले.
तरीही उपचारादरम्यान पाचही जणांचा मृत्यू झाला. याआधीही हिमस्खलनात राज्यातील तीन जवान मरण पावले होते. गेल्या आठवड्यात गुरेझ सेक्टरमधील हिमस्खलनात शहीद झालेल्या १४ सैनिकांचे मृतदेहही सोमवारी श्रीनगरला आणण्यात आले. येथून ते त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार असून, तेथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. या जवानांचा नियंत्रण रेषेजवळील गुरेझ सेक्टरमध्ये (जि. बांदिपुरा) २५ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. तथापि, खराब हवामानामुळे त्यांचे मृतदेह पाठविता आले नव्हते, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.
लष्करी वैमानिकांनी माछील आणि गुरेझ सेक्टरमध्ये पोहोचण्याचा गेल्या आठवड्यात अनेकदा प्रयत्न केला. मात्र, बर्फवृष्टीमुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. आज त्यांना यश आले. त्यांनी ५ जखमी जवानांसह १४ जवानांचे मृतदेह श्रीनगरला आणले.
गेल्या सहा दिवसांत काश्मिरातील हिमस्खलनात एका अधिकाऱ्यासह २० सैनिक शहीद झाले. तसेचा पाच नागरिकही अशाच दुर्घटनांत मृत्युमुखी पडले. काश्मिरातील उंच पर्वतीय भागात गेल्या आठवड्यात तुफान बर्फवृष्टी झाली. त्यामुळेच जखमी जवानांना श्रीनगरला हलविता आले नव्हते.
शहिदांत तीन महाराष्ट्राचे जवान
मच्छील सेक्टरमधील हिमस्खलनात मरण पावलेल्या जवानांत महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. गणेश किसन ढवळे, रामचंद्र शामराव माने आणि बालाजी भगवानराव अंबोरे, अशी त्यांची नावे आहेत. गणेश ढवळे (वय ३०) हे साताऱ्यातील वाई तालुक्याचे, रामचंद्र माने (वय ३४) सांगली जिल्ह्णातील कवठे महांकाळ येथील, तर बालाजी अंभोरे (वय २६) मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्णातील आहेत. याशिवाय तामिळनाडूच्या मदुराई येथील तमोतारा कन्नन (वय २७) आणि गुजरातच्या भावनगर जिल्ह्णातील देवा डाह्णाभाई परमार (वय २७) या जवानांचाही मृतांत समावेश आहे.
आसरे गावावर शोककळा
वाई : वाई तालुक्यातील आसरे आंबेदरावाडी येथील जवान गणेश कृष्णा ढवळे (वय २९) हे जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झाले. घटनेची बातमी मिळताच गावावर शोककळा पसरली. शेतकरी कुटुंबातील गणेश यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, ते २०१२ मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांचे वडील कृष्णा व आई राधा हे गावी शेती करतात. गणेश यांचा तीन वर्षांपूर्वी रेश्मा हगवणे-देसाई हिच्याबरोबर विवाह झाला. त्यांना समर्थ हा पाच महिन्यांचा मुलगा आहे. हवामान अनुकूल असल्यास गणेश यांचे पार्थिव मंगळवार, दि. ३१ रोजी सायंकाळपर्यंत आसरे येथे पोहोचण्याची शक्यता आहे.