सांगलीतील कवठेएकंदमध्ये ५० एकर ऊस जळून खाक, चार दिवसांत दुसरी घटना
By अशोक डोंबाळे | Published: January 19, 2024 05:55 PM2024-01-19T17:55:40+5:302024-01-19T17:56:08+5:30
कवठेएकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील डिग्रज वाट परिसरातील ऊस क्षेत्राला बुधवारी रात्री आग लागली. आगीत सुमारे ५० ...
कवठेएकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील डिग्रज वाट परिसरातील ऊस क्षेत्राला बुधवारी रात्री आग लागली. आगीत सुमारे ५० एकर ऊस जळून खाक झाला. गेल्या चार दिवसांत शिवारात आगीच्या दोन घटना घडल्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आगीत सुमारे ७५ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जळीतग्रस्त भागामध्ये जाऊन आमदार सुमनताई पाटील यांनी पाहणी केली. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. वसंतदादा कारखान्याचे विशाल पाटील यांनीही कवठे एकंद येथे भेट देऊन जळीतग्रस्त ऊस तोडणीसाठीची तातडीने मदत करण्यासाठी नियोजन केले.
शिवारात सुमारे दोन हजारांहून अधिक एकर उसाचे क्षेत्र आहे. सलग ऊस क्षेत्र असल्यामुळे आग लागण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी काही वेळा वीजवाहक तारांमधून ठिणग्या उडाल्याने आग लागल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, परिसरात विद्युत वाहक तारा नसतानाही आगीचे प्रकार घडल्याने आगीचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. कारखानदारांनी त्वरित ऊस तोडणी करावी. तसेच शासनाने जळीतग्रस्त ऊस उत्पादकाला भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.