सांगली मार्केट यार्डातील ५० कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:06+5:302021-05-15T04:26:06+5:30
सांगली : कडक लॉकडाऊनमुळे मागील गुरुवारपासून येथील मार्केट यार्ड व फळमार्केट बंद आहे. आठ दिवसांत सुमारे ५० कोटी रुपयांची ...
सांगली : कडक लॉकडाऊनमुळे मागील गुरुवारपासून येथील मार्केट यार्ड व फळमार्केट बंद आहे. आठ दिवसांत सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दरम्यान, बंदमुळे मार्केट यार्डामध्ये शुकशुकाट आहे. शनिवारी लॉकडाऊन संपणार आहे, त्यानंतर अत्यावश्यक सेवेला मुभा मिळणार असल्याने सोमवारपासून व्यवहार नियमित सुरू होण्याची शक्यता आहे.
शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दक्षतेचा उपाय म्हणून बाजार समितीने १२ मेपर्यंत यार्डातील शेतीमालाचे सर्व सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मार्केट यार्डात आठ दिवसांपासून हळद, गूळ, बेदाणा सौदे बंद आहेत. या बंदमुळे सुमारे ५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे सांगण्यात आले. रविवारपर्यंत यार्ड बंद राहणार आहे. यामुळे आणखी दहा ते पंधरा कोटीची उलाढाल ठप्प होणार आहे.
मार्केट यार्डात दिवसभर हमाल, शेतकरी, अडते, खरेदीदार यांची मोठी वर्दळ होत असते. मात्र बंदमुळे शुकशुकाट आहे. सोमवारपासून मार्केट यार्डातील व्यवहार सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे, असे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.
चौकट
बाजार समितीचे ५० लाखांचे उत्पन्न बुडाले : महेश चव्हाण
कोरानामुळे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे ५० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. यामध्ये विष्णूअण्णा फळ मार्केटचे १५ लाख आणि सांगली मार्केट यार्डातील ३५ लाखांचे उत्पन्न कराच्या माध्यमातून मिळत होते. बंदमुळे सर्वत्र शेतीमालाची उलाढाल ठप्प झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.