सांगली महापालिकेस 'इतक्या' कोटींचे 'कोरोना साहाय्य अनुदान' प्राप्त, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार ५० लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:46 PM2022-11-03T13:46:45+5:302022-11-03T13:47:10+5:30
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळाला मोठा आधार
सांगली : कोरोनाच्या काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले. यात काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्य शासनाने मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे साहाय्य अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महापालिकेला सहा कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. यातून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांची रक्कम दिली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाकाळात महापालिका सर्व स्तरावर साथ आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेत होती. सफाई कामगारापासून आयुक्तापर्यंत सारेच अधिकारी रस्त्यावर होते. आरोग्य विभागाकडील डाॅक्टर, परिचारिका, आशा वर्कर होम टू होम जाऊन सर्वेक्षण करत होत्या. महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी १०० खाटांचे केअर सेंटरही सुरू केले होते. या केअर सेंटरमध्ये दोन हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. सफाई कामगारांकडून शहराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात होते. अशात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती.
कोरोनामुळे महापालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यात प्रभारी स्वच्छता निरीक्षक, दोन वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, बागमजूर, वाहनचालकासह चार सफाई कामगारांचा समावेश होता. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २०२१ मध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. महापालिकेकडून मृत कर्मचाऱ्यांची माहितीही मागविली होती. त्यानुसार महापालिकेने आवश्यक ती माहिती शासनाला सादर केली होती. आता शासनाने मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेला ६ कोटींचा निधीही वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.