Sangli: चाळीस लाखांच्या कर्जाचे ५० लाख व्याज, बलवडीच्या सावकारावरावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 05:10 PM2024-09-21T17:10:49+5:302024-09-21T17:12:02+5:30
मुलाच्या आजारपणावरील उपचार, व्यवसायासाठी घेतले होते कर्ज
विटा : मुलाच्या आजारपणावरील उपचार व काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दरमहा ३ टक्के व्याज दराने घेतलेल्या ४० लाख रुपये कर्जाची निव्वळ व्याजाची रक्कम ५० लाख रुपये केली. त्यानंतर कर्ज आणि व्याज मिळून ९० लाख रुपयांच्या वसुलीसाठी बलवडी (भा.) येथील मनोहर ईश्वर पवार (वय ४५) यांच्याकडे सातत्याने तगादा लावून त्रास दिला. याकरणी गुरुवारी विटा पोलिस ठाण्यात जगन्नाथ दत्तू पवार (रा. बलवडी-भाळवणी, ता.खानापूर) या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बलवडी (भा.) येथील मनोहर पवार यांनी मुलाच्या औषधोपचार व काजू प्रक्रिया व्यवसायासाठी कर्ज हवे होते. गावातीलच खासगी सावकार संशयित जगन्नाथ पवार यांच्याकडून ४० लाख रुपये कर्ज दरमहा ३ टक्के व्याज दराने रक्कम जुलै २०१७ ते मे २०२० या कालावधीत वेळोवेळी घेतले होते. त्यापोटी जुलै २०१७ पासून नोव्हेंबर २०१९ पर्यंत मनोहर यांनी जगन्नाथ पवार यांना दरमहा तीन टक्के व्याजदराने २० लाख रुपयांची परतफेड केली.
तरीही संशयित जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या पलूस येथील घरी पहाटे व बलवडी येथील घरी रात्रीच्या वेळी जाऊन मनोहर यांच्याकडे व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला होता. त्यानंतर दि. ३० जून २०२३ रोजी जबरदस्तीने जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या मालकीचे बलवडी (भा.) येथील गट नं. २३० मधील ६७.८७ आर व गट नं. ११३/१ मधील ५९.६८ आर क्षेत्र रक्कम रुपये ९० लाख हे काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दिल्याबाबत ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करारपत्र/ साठेखत करून घेतले.
त्या नोटरीच्या आधारे संशयित जगन्नाथ पवार हा मनोहर यांच्याकडे पैशांबाबत तगादा लावून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत होता. याप्रकरणी मनोहर पवार यांनी गुरुवारी पवार यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी खासगी सावकर पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ स बीएनएस कलम ३०८ अन्वये विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.