पन्नास लाखांची खंडणी : पाचजणांवर गुन्हा
By admin | Published: November 5, 2014 11:55 PM2014-11-05T23:55:59+5:302014-11-06T00:02:08+5:30
पोलीसप्रमुखांच्या आदेशानुसार कारवाई : वाघवाडीतील प्रकार
इस्लामपूर : वाघवाडी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या व्यावसायिकास पन्नास लाखांच्या खंडणीसाठी धमकावून, दहा ते बाराजणांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी केवळ मारहाण व गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल करुन संशयितांना अभय दिले होते. मात्र यातील पीडित कुटुंबाने आज बुधवार सांगलीत जिल्हा पोलीसप्रमुखांची भेट घेऊन कैफियत मांडल्यावर, त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा मोहन काशिनाथ मदने याचेसह चार ते पाचजणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भावेश नारायण पटेल (वय २५, रा. वाघवाडी फाटा) असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. मोहन काशिनाथ मदने, शंकर लोहार व इतर १0 ते १२ जणांसह आई-वडील, मामेभाऊ अशा नातलगांनी रविवारी रात्री पटेल यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. भावेश पटेल यांच्या डोक्यात खुर्ची घालून मोठी दुखापत केली आहे. गेल्या महिन्याभरापासून मदने हा पटेल यांच्याकडे पैशाची मागणी करीत होता. ‘नाही तर जागा खाली करा, तुमची जागा दुसऱ्याला विकून टाकणार’, अशी भीती घालत होता.
भावेश पटेल यांचे फाट्यावर सिमेंटच्या चौकटी विकण्याचे एस. के. ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. महामार्गालगतची १५ गुंठे जागा त्यांनी जुलै २०१४ मध्ये खरेदी केली आहे. या जागेशी मदने याचा संबंध नसताना, तो पैशाची मागणी करीत होता, असे पटेल कुटुंबियांनी सांगूनही पोलिसांनी फिर्यादीत त्याचा उल्लेख न करता, केवळ मारहाण व गर्दी मारामारीचा गुन्हा नोंद केला. यामुळे व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पोलिसांच्या या बोटचेपेपणामुळे पटेल कुटुंबाने आज जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर मदने याच्याकडून सुरु असलेल्या त्रासाची माहिती दिली. यावेळी इस्लामपूरचे पोलीस उपअधीक्षक आनंद पाटील सुध्दा तेथे उपस्थित होते. सावंत यांनी पाटील यांना, चौकशीअंती कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार पटेल कुटुंबीय बुधवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षकांकडे आले होते. अखेरीस रात्री उशिरा का होईना पोलिसांकडून मोहन मदने व चार ते पाचजणांविरुध्द खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. (वार्ताहर)