रस्ता सुरक्षा अभियान काळात ५० जणांचा बळी, सांगलीत अपघातांचे प्रमाण वाढले

By घनशाम नवाथे | Updated: February 7, 2025 16:08 IST2025-02-07T16:08:22+5:302025-02-07T16:08:40+5:30

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळी

50 people died during the road safety campaign, the number of accidents increased in Sangli | रस्ता सुरक्षा अभियान काळात ५० जणांचा बळी, सांगलीत अपघातांचे प्रमाण वाढले

रस्ता सुरक्षा अभियान काळात ५० जणांचा बळी, सांगलीत अपघातांचे प्रमाण वाढले

घनशाम नवाथे 

सांगली : पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात होता. नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला. आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवले गेले. परंतु या महिन्यात जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल ५० जणांचा अपघाती बळी गेला. त्यामुळे हे अभियान सतत राबवण्याची आवश्यक आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरज भासू लागली आहे.

जिल्ह्यात पूर्वी वारंवार अपघात होणारे जवळपास ६० ते ७० ‘ब्लॅक स्पॉट’ होते. याठिकाणी वर्षानुवर्षे अपघाताचा धोका दर्शवणारे फलक होते. परंतु अपघातस्थळे नष्ट करण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत अपघातस्थळे कायम आहेत.

एकीकडे अपघातस्थळे नष्ट केली जात असून रस्तेही मोठे झाले आहेत. पूर्वी नादुरुस्त रस्ते, खड्डे, गतिरोधक आदी कारणामुळे अपघात होत होते. परंतु आता मानवी चुकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे आदी कारणामुळे अपघात होऊ लागलेत.

नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. आरटीओ, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. परंतु याच महिन्याच्या काळात तब्बल ५० जणांचा अपघाती बळी गेला. तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हे अभियान आता महिन्यापुरते नव्हे तर वर्षभर सामाजिक चळवळ म्हणून राबवण्याची गरज आहे.

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळी

रस्ता सुरक्षा अभियानात उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली. परंतु ती शंभर टक्के पूर्ण झाली नाही. त्यामुळेच जानेवारी महिन्यात उसाच्या ट्रॅक्टर, ट्रॉलीमुळे आठ जणांचा बळी गेला. तसेच त्यापेक्षा जास्त वाहन चालक जखमी झाले. ट्रॅक्टर मालक, चालकांच्या बेदरकारपणामुळे दरवर्षी अनेकांचा बळी जातो.

जत तालुक्यात अपघात वाढले

जानेवारी महिन्यात जत तालुक्यात आठ जणांचा अपघाती बळी गेला. त्यापाठोपाठ इस्लामपूरमध्ये सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला. भिलवडी (५), आटपाडी (४), तासगाव (३), विटा (३), कडेगाव (३), पलूस (३) याप्रमाणे १८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ५० जणांचा बळी गेला.

अपघाताची कारणे

चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, स्वत: बद्दल फाजिल आत्मविश्वास बाळगून वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे आदी प्रमुख कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.

आजार, युद्धापेक्षा जास्त बळी

रस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. एखाद्या आजाराच्या साथीमध्ये किंवा युद्धात ही जात नाहीत इतके बळी अपघातात जातात असे सांगितले गेले. त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी चळवळीची गरज भासू लागली आहे.

Web Title: 50 people died during the road safety campaign, the number of accidents increased in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.