रस्त्यावर धावणाऱ्या ५० टक्के खासगी बसेस सदोष, सांगली आरटीओच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर
By शीतल पाटील | Published: July 17, 2023 11:57 PM2023-07-17T23:57:16+5:302023-07-17T23:57:48+5:30
आरटीओ कार्यालयाकडून आतापर्यंत ७५ बसेसची तपासणी करण्यात आली. त्यात ५० टक्के बसेस सदोष आढळल्या आहेत.
सांगली : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला झालेल्या अपघातानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने बसेसच्या तपासणीची मोहिम हाती घेतली आहे. आरटीओ कार्यालयाकडून आतापर्यंत ७५ बसेसची तपासणी करण्यात आली. त्यात ५० टक्के बसेस सदोष आढळल्या आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याचे उघड झाले.
खासगी प्रवाशी बसेसच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर १ जुलैपासून आरटीओ कार्यालयाने खासगी बसेसच्या तपासणीची मोहिम हाती घेतली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही मोहिम हाती घेतली होती. गेल्या पंधरा दिवसात ७५ बसेसची तपासणी करण्यात आली. त्यात ३५ बसेस दोषी आढळल्या. या मोहिमेत वेग नियंत्रकाशी छेडछाड, अग्निशमन यंत्रणा नसणे, परवाना अटीचा भंग, अवैध टप्पा वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, लाईट, रिफ्लेक्टर सुस्थिती नसणे, चालकाचा गणवेश नसणे, सुरक्षा साधनाचा अभाव असे दोष आढळून आले. दोषी बसेसवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
यावेळी आरटीओ विभागाकडून चालकांचे प्रबोधन करण्यात आले. यात चालकास लेन कटींग बद्दलचे नियम, चूकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग न करणे, मद्यप्राशन न करणे, आग विझवणारी उपकरणे व प्रथमोपचार उपचार पेटी सुस्थितीत ठेवणे, घाट मार्गामध्ये वाहन चालवताना न्युट्रल न करणे, लांब पल्लांच्या प्रवासामध्ये वाहन चालकाने दोन ते तीन तासानंतर पुरेशी विश्रांती घेणे, वेग मर्यादेचे पालन करणे, आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत ठेवणे, चालकाने नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आदिचा समावेश होता.
चालकांना सक्त सूचना
खासगी बसेसमधील सुरक्षा साधने, आपत्कालीन दरवाजाचा वापर व इतर माहिती प्रवाशांना बसचालकांनी द्यावी, अशी सक्त सूचनाही करण्यात आली. खासगी बसचालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करूनच प्रवासी वाहतूक करावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत साळे यांनी दिला.