वाळू ठेक्याचे ५१ प्रस्ताव पर्यावरण समितीकडे
By admin | Published: November 7, 2014 10:57 PM2014-11-07T22:57:14+5:302014-11-07T23:39:43+5:30
वाळू महागली : बांधकाम व्यवसाय ठप्प; वाळूचा दर महिन्यात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले
सांगली : यावर्षीचे वाळूचे ५१ प्रस्ताव राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, वाळूचा दर गेल्या महिन्याभरात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढला आहे. याचा बांधकाम व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
गतवर्षी जिल्ह्यातून वाळू उपशासाठी १२५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना पर्यावरण समितीने मंजुरीही दिली होती. यामधील प्रत्यक्षात ५२ वाळू प्लॉटच्या ठेक्यांनाच मागणी झाल्याने त्यांचे लिलाव काढण्यात आले होते. यामधून जिल्हा प्रशासनाला सुमारे ३६ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. या प्लॉटसाठीची उपसा मुदत सप्टेंबरअखेर संपली आहे.
यावर्षी वाळू प्लॉट लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ५१ वाळू प्लॉटसाठी ग्रामसभेचीही मंजुरी घेण्यात आली आहे. ग्रामसभेची मंजुरी घेण्यात आलेले ५१ वाळूचे प्रस्ताव आता आठवड्यापूर्वीच मंजुरीसाठी पर्यावरण समितीकडे पाठविण्यात आले आहेत. पर्यावरण समितीकडून आठवड्याभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यासाठी प्लॉटचे प्रशासकीय दर विभागीय आयुक्त निश्चित करणार आहेत. यावर्षीही लिलाव आॅनलाईनच काढण्यात येणार आहेत.
वाळू उपसा बंद झाल्याने वाळूचे दर मात्र भडकले आहेत. गेल्या महिन्यात साडेचार ते पावणेपाच हजार रुपये ब्रास असणारी वाळू आता साडेसहा हजार रुपये ब्रास झाली आहे. सध्या शिल्लक वाळूच विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाळू नसल्यामुळे बांधकाम व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. सर्वसाधारणपणे बांधकाम व्यवसाय हा आॅक्टोबर ते मेअखेर चालणार आहे. (प्रतिनिधी)
वाळूचे दर दोन हजारने वाढले
गेल्या महिन्याभरात वाळूचे दर ब्रासला दोन हजार रुपये वाढले आहेत. गेल्या महिन्यात वाळूचा दर साडेचार हजार रुपये होता, तो आता साडेसहा हजाराच्या घरात गेला आहे. यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वाळू विक्रेते संतोष पाचुंदे यांनी व्यक्त केली. इतर जिल्ह्यांतूनही वाळूची वाहतूक सध्या बंद आहे. यामुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे.
पर्यावरण समितीकडे ५१ वाळूचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यापुढेही ग्रामसभेच्या मंजुरीनंतर आणखीन वाळू प्रस्ताव पर्यावरण समितीकडे पाठविण्यात येणार आहेत.
- देवदत्त ठोंबरे, प्रभारी खणीकर्म अधिकारी, सांगली