जिल्ह्यातील ५१,७४४ वीज ग्राहकांनी ४९ कोटी भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:58+5:302021-03-23T04:27:58+5:30
सांगली : जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ७९८ ग्राहकांकडे १२० कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी ५१ हजार ...
सांगली : जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ७९८ ग्राहकांकडे १२० कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी ५१ हजार ७४४ ग्राहकांनी ४९ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. उर्वरित थकबाकीदार वीजबिलाचा भरणा करत नसल्यामुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यातील सहा हजार ९४३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.
कोरोनामध्ये महावितरणकडून वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग व्यवस्थित घेतले नव्हते. यामुळे नागरिकांना जादा वीजबिल गेली होती. यातून वीज ग्राहक आणि महावितरणमध्ये टोकाचा संघर्ष झाला. राज्य शासनानेही कोरोना कालावधीतील वीजबिलाबाबत ठोस निर्णय घेतला नाही. या सर्व गोंधळाचा महावितरणच्या वीजबिल वसुलीवर परिणाम झाला आहे. सांगली जिल्ह्यात दोन लाख ६० हजार ७९८ वीज ग्राहकांकडे १२० कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून थकबाकी वसुलीची विशेष मोहीम राबविल्यामुळे वसुलीचा टक्का सध्या वाढला आहे. जिल्ह्यात १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२१ या कालावधीत घरगुती, वाणिज्य व औद्योगिकमधील ५१ हजार ७४४ वीज ग्राहकांनी ४८ कोटी ७० लाख रुपये वीजबिल भरले आहे. यामध्ये घरगुती ४७ हजार ४९१ वीज ग्राहकांनी ३५ कोटी ३९ लाख रुपये भरले आहेत. वाणिज्य क्षेत्रातील तीन हजार ४१७ ग्राहकांनी नऊ कोटी १९ लाख आणि औद्योगिक ८३६ ग्राहकांनी चार कोटी ११ लाख रुपये भरले आहेत. ५० टक्के वीज ग्राहकांमध्ये वीजबिल भरण्याचा कल आहे, पण उर्वरित ग्राहकांकडून आजही वीजबिल भरण्याबाबत कोणताही प्रतिसाद नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वीजबिल न भरलेल्या सहा हजार ९४३ ग्राहकांचा वीज पुरवठाही खंडित केला आहे. यापुढे वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांविरोधात वीज पुरवठा खंडितची विशेष मोहीम राबिवली जाणार आहे.
चौकट
सुट्टी दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे चालू
चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. ग्राहकांना वीजबिल भरणा करणे सोपे होण्यासाठी महावितरण कंपनीने हा निर्णय घेतल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांनी सांगितले.