जिल्ह्यात ५२८ शाळा अवघड क्षेत्रात

By admin | Published: April 10, 2017 09:38 PM2017-04-10T21:38:23+5:302017-04-10T21:38:23+5:30

जिल्हा परिषदेची घोषणा : वेबसाईटवर याद्या अपलोड करण्याचे काम वेगात

528 schools in difficult areas in the district | जिल्ह्यात ५२८ शाळा अवघड क्षेत्रात

जिल्ह्यात ५२८ शाळा अवघड क्षेत्रात

Next


सातारा : जिल्ह्यातील २ हजार ७१६ शाळांपैकी तब्बल ५२८ शाळा या दुर्गम (अवघड) क्षेत्रात असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी जाहीर केले. उर्वरित २ हजार १८८ शाळा सुगम (सर्वसाधारण) क्षेत्रात असणार आहेत. त्यानुसारच शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शासनाने १५ मे २०१४ रोजी शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत शासन आदेश काढला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सुगम व दुर्गम गावे निश्चित करण्याचे काम सुरू असून, सुगम भागातील जास्तीत जास्त गावे दुर्गम प्रकारात बसावीत, यासाठी शिक्षक मंडळींनी राजकीय फिल्डिंग लावल्याची जोरदार चर्चा होती.
शिक्षकांच्या बदल्या तालुक्यांतर्गत होत होत्या. शासनाच्या नव्या आदेशानुसार आता शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण जिल्हा स्तरावरून ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्यांचे पूर्ण अधिकार असणार आहेत.
ज्या शिक्षकांनी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त अधिक काळ सुगम भागात सेवा बजावली आहे, त्यांची बदली दुर्गम भागात केली जाणार आहे. तर ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावली आहे, त्या शिक्षकांना सुगम भागात सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.
जी गावे तालुका मुख्यालयापासून दूर आहे, दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यात सोई-सुविधा नाहीत, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे ही अवघड क्षेत्रे म्हणून निश्चित करण्यात येणार आहेत. अवघड क्षेत्रे निश्चितीची कार्यवाही करताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत तालुक्यातील सर्वसाधारण तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सुगम व दुर्गम गावे निवडण्यासाठी शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बांधकाम अभियंता यांची कमिटी नेमली होती. या कमिटीच्या माध्यमातून शिक्षण विभागाने (प्राथमिक) गावांच्या याद्या मागवल्या होत्या. सोमवारी त्या प्राप्त झाल्या. या याद्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे काम सोमवारी सुरू होते. जिल्हा परिषद इमारतीमध्येही या याद्या लावण्यात येणार आहेत. त्या मंगळवारी पाहायला मिळणार आहेत. जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर कुठूनही याद्या पाहता येणार आहेत. (प्रतिनिधी)


रिक्त जागांची
होणार घोषणा
शिक्षक बदलीचा पहिला टप्पा सोमवारी पार पडणारे अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात आले. यानंतर आता रिक्त जागांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी दिली.

Web Title: 528 schools in difficult areas in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.