Sangli: म्हैसाळ, टेंभू योजनेसाठी ५४.३८ कोटी मंजूर; कवठेमहांकाळमधील १४ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:39 PM2024-05-29T16:39:23+5:302024-05-29T16:41:27+5:30
कवठेमहांकाळ : खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे म्हैसाळ व टेंभू योजनेच्या ५४.३८ ...
कवठेमहांकाळ : खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे म्हैसाळ व टेंभू योजनेच्या ५४.३८ कोटीच्या लघु वितरिका मंजूर झाल्या आहेत. या माध्यमातून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे १४ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यातील मणेराजुरी मुख्य वितरिका, मणेराजुरी उपवितरिका, योगेवाडी, उपळावी लघु वितरिका, वज्रचाैडे अशा १३.५३ कोटीच्या लघु वितरिका म्हैसाळ योजनेतून मंजूर झाल्या आहेत. म्हैसाळ योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यात विठुरायाची वाडी, कवठेमहांकाळ, थबडेवाडी, पिंपळवाडी, अग्रण धुळगाव, नांगोळे, अलकुड (एस), रांजणी आणि लोणारवाडी लघु वितरिका मंजूर झाल्या आहेत. याकरिता ३२.३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
टेंभू योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यात दहा गावांत ८.५ कोटीच्या लघु वितरिका मंजूर झाल्या आहेत. यामुळे नागज, रांजणी, कोकळे, ढालेवाडी, करलहट्टी, बसाप्पाचीवाडी, मोघमवाडी, इरळी, अलकूड (एस), ढोलेवाडी या गावच्या शेतीच्या व पिण्याच्या प्रश्न सुटणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून याबाबत आम्ही अधिकाऱ्यांसह गावभेटी केल्या. खासदार संजय पाटील यांनी याप्रकरणी अधिकाऱ्याची बैठक घेतली. कामाच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. काही ठिकाणी कामाला सुरुवातही झाली आहे.
टेंभू योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यात एक हजार एकर, तर म्हैसाळ योजनेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील ७,७८० एकर, तासगाव तालुक्यातील ५,२२७ एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दोन्ही तालुक्यांत ५४.३८ कोटींच्या लघु वितरिका मंजूर झाल्या आहेत. यातून सुमारे १४ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे लघु वितरिका मंजूर झाल्या.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, सदस्य राजाराम पाटील, नगरसेवक रणजित घाडगे, ईश्वर वनखडे, सोमनाथ लाटवडे, जलाल शेकडे, दयानंद सगरे, पिंटू माने उपस्थित होते.