सांगलीत ५५ रिक्षा जप्त
By admin | Published: July 10, 2014 11:09 PM2014-07-10T23:09:13+5:302014-07-10T23:18:10+5:30
दंडात्मक कारवाई : वाहतूक पोलिसांची मोहीम
सांगली : नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या पेट्रोल व डिझेल रिक्षाचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या दोन दिवसात ५५ रिक्षा जप्त केल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन रिक्षा सोडण्यात येत आहे. मात्र अद्याप १५ रिक्षा वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयाजवळ आहेत. ही कारवाई आणखी तीव्र करणार आहे, असा इशारा पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिला आहे.
रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांची रिक्षाचालकांनी माहिती द्यावी, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी चार दिवसांपूर्वी सांगली, मिरजेतील रिक्षाचालकांची बैठक घेतली होती. त्यावेळी पेट्रोल व डिझेल चालकांनी एकमेकांची उणी-दुणी काढली होती. पेट्रोल चालकांनी डिझेल रिक्षाची टप्पा वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती, तर डिझेल चालकांनी विनापरवाना अनेक रिक्षा फिरत आहेत, बॅचबिल्लाही त्यांच्याकडे नाही, या चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सावंत यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
गेल्या दोन दिवसांपासून नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या चालकांवर कारवाई सुरु केली होती. यामध्ये डिझेलची टप्पा वाहतूक, परमीट नसताना रिक्षा चालविणे, परवाना नसणे, नंबरप्लेट नसणे असे कारवाईचे स्वरुप आहे. ५५ रिक्षा जप्त केल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंड भरणाऱ्या रिक्षा सोडून दिल्या जात आहेत, दंड न भरणाऱ्या रिक्षा कार्यालयाच्या आवारात आहेत. (प्रतिनिधी)