सांगली शहरातील ५५० मिळकत पत्रिका गायब
By अशोक डोंबाळे | Updated: April 11, 2025 18:18 IST2025-04-11T18:18:14+5:302025-04-11T18:18:42+5:30
तत्कालीन अधिकाऱ्यांची पोलिसांमध्ये तक्रार : नवीन मिळकत पत्रिका संबंधितांना कधी मिळणार?

सांगली शहरातील ५५० मिळकत पत्रिका गायब
अशोक डोंबाळे
सांगली : सांगली शहरातील सिटी सर्व्हेच्या सुमारे ५५० मिळकत पत्रिका मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तत्कालीन अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. परंतु नवीन मिळकत पत्रिका तयार करण्याबाबत अद्याप कोणतेही प्रयोजन करण्यात आले नसल्याने मिळकतीधारक चिंतेत आहेत. संबंधित मिळकत पत्रिकाधारकांना नवीन मिळकत पत्रिका कधी मिळणार, असाही प्रश्न शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नगर भूमापन कार्यालयातील काही वादग्रस्त कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे नगर भूमापन कार्यालयातील ५५० मिळकत पत्रिका मिळत नाहीत. तत्कालीन तिघा अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई न करता जबाबदारी झटकून निघून गेले. कार्यकाल संपवून त्या अधिकाऱ्यांच्या अन्य ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. परंतु नवीन आलेले अधिकारी सांगली शहरातील ५५० मिळकत पत्रिकांचा शोध लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळकत पत्रिका मिळत नसल्याच्या गोंधळाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी त्या म्हणाल्या, मिळकत पत्रिका जुन्या असल्यामुळे काही मिळकत पत्रिकांबाबत गोंधळ आहे. काही मिळकत पत्रिकांवर क्षेत्र नाही, तर काहींवर नावच नाहीत. यामध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. नवीन मिळकत पत्रिका देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत.
नवीन मिळकत पत्रिकांचे काम सुरू..
१९२८ पासूनच्या मिळकत पत्रिका आहेत. जुन्या असल्यामुळे त्या मिळकत पत्रिकांवर काही ठिकाणी नावच नाहीत. तसेच काही ठिकाणी मिळकत पत्रिकावर क्षेत्र नाही. हा सर्व गोंधळ ऑनलाईनमुळे उघडकीस आला आहे. सांगली शहरात एकूण ३० हजारांपर्यंत मिळकत पत्रिका असून त्यामध्ये ५५० मिळकत पत्रिकांचा गोंधळ आहे. या मिळकत पत्रिका नव्याने करण्याचे काम चालू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळकत पत्रिका गायब करणारांवर कारवाई..
नगर भूमापन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक मिळकत पत्रिका गायब केल्या असतील, तर दोषींवर कारवाई करण्यात येईल. यासंबंधीची चौकशी करून गायब मिळकत पत्रिकांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असेही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगली शहरातील मिळकत पत्रिका
- एकूण मिळकत पत्रिका : ३०,०००
- गायब मिळकत पत्रिका : ५५०