Coronavirus: सांगली जिल्ह्यात ५५ हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:14+5:302021-04-26T13:20:45+5:30
सांगली : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला तोंड देताना जिल्ह्यात तब्बल ५५ हजार ७१० लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली ...
सांगली : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला तोंड देताना जिल्ह्यात तब्बल ५५ हजार ७१० लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाला हरवून दाखविताना त्यांनी सकारात्मक मानसिकता व वेळेत उपचाराचा मंत्र जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.
सांगली जिल्ह्यात आजअखेर ६९ हजार १९१ जणांना कोरोना झाला. यातील तब्बल ८१ टक्के म्हणजे ५५ हजार ७१० लोकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनातून बहुतांश लोक बाहेर पडताना दिसत आहेत. त्याचा यशस्वीपणे मुकाबला करणे शक्य असल्याचे चित्र या आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता, लक्षणे दिसताच चाचणी करून घेणे, वेळेत उपचार घेताना सकारात्मक मानसिकता ठेवणे या गोष्टींचा अंगीकार करायला हवा, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असली तरी त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बरे होणाऱ्यांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांचा व अन्य आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांचाही समावेश आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती यातून बाहेर पडू शकते, हे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
चौकट
आजवर झालेल्या एकूण स्वॅब तपासण्या २,२५,०००
कोरोना लागण झालेले ६९,१९१
निगेटिव्ह १,६९,२९०
कोरोनावर मात करणारे ५५,७१०
सध्या उपचार घेत असलेले ११३७८
चौकट
आम्ही दररोज कोरोनाला हरवतोय
सोमवार ४००
मंगळवार ३६७
बुधवार ४२९
गुरुवार ४६३
शुक्रवार ५५०
शनिवार ६४२
रविवार ७४९
वेळेत तपासणी केल्यानंतर उपचारही वेळेत सुरू झाले. सकारात्मक मानसिकता ठेवल्यामुळे बरे हाेण्यास मदत झाली. त्रास झाला तरी त्यातून बाहेर पडले.
- रोहिणी रेनके, कोरोनामुक्त
टाळाटाळ केल्यास कोरोना त्रासदायी ठरतो; मात्र वेळेत उपचार सुरू केल्यास व सकारात्मक मानसिकता ठेवल्यास कोरोनाला हरवणे अगदी सोपे आहे. त्यामुळे नागरिकांनी व बाधितांनी या गोष्टीची काळजी घ्यावी.
- महेश कराडकर, कोरोनामूक्त
मला दोनवेळा कोरोना झाला. तरीही त्यातून बाहेर पडलो. यासाठी लक्षणे दिसताच चाचणी व उपचार घेतले. तज्ज्ञ डॉक्टरांचे व्हिडिओ पाहणेही लाभदायी ठरले. त्यामुळे कोरोनाशी लढण्याचा मंत्र मिळाला.
- दिनकर पाटील, सभापती, बाजार समिती
लक्षणे जाणवल्यास लगेच चाचणी करणे, डॉक्टर शॉपिंग न करता एकाच ठिकाणी तातडीने उपचार घ्यावेत. स्वत:हून औषधांची मागणी करू नये. केवळ १४ दिवसांचा प्रश्न असल्याने सकारात्मक मानसिकता ठेवावी. यातून कोरोनावर मात करता येते.
- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली
पाॅझिटिव्हिटी रेट होतोय कमी
सध्या पॉझिटिव्हिटी रेट ३१ टक्के आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रमाण कमी अधिक होत आहे. अँटिजेन टेस्टमधील पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के आहे.