जिल्ह्यात ५५ हजार टन खत उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:19+5:302021-05-11T04:27:19+5:30
सांगली : उन्हाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्जता केली आहे. यंदा तीन लाख ८६ हजार ...
सांगली : उन्हाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्जता केली आहे. यंदा तीन लाख ८६ हजार १२० हेक्टर पेरणी होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात ५५ हजार ६४९ टन रासायनिक खते आली आहेत. आतापर्यंत विविध पिकांचे ३३१९ क्विंटल बियाणे आले आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
यंदाचा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये लगबग आहे. कृषी विभागाने ३३ हजार क्विंटलची बियाणांची मागणी केली होती. आतापर्यंत ३३१९ क्विंटल बियाणे आले आहेत. त्यामध्ये भात ४४५ क्विंटल, ज्वारी ६१ क्विंटल, बाजरी ४० क्विंटल, २६३१ क्विंटल, उडिद ४९ क्विंटल, मका ९३ क्विंटलचा समावेश आहे.
खतांची १ लाख ४२ टनांची मागणी केली होती. सध्या जिल्ह्यात डीएपी, युरिया, एमओपी, एनपीके, एसएसपी, कंपोस्ट आदी ५५ हजार ६४९ टन रासायनिक खते आली आहेत. मान्सूनला महिन्याभराचा अवधी असला तरी कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली आहे.
चौकट
अकरा भरारी पथकांची नियुक्ती
जिल्ह्यात खते व बियाण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून अकरा भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. खते, बियाणांसाठी जादा रक्कम घेणे, खराब बियाणे आदींबाबत कृषी विभागाकडे तक्रार केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. बियाणांचे ९९६, खते ५४८, कीटकनाशकांचे ४१५ नमुने, बियाणे विक्रेते २४४७, खत विक्रेते ३१७५, कीटकनाशके विक्रेते २७०७ यांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.
चौकट
उन्हाळी सोयाबीनचाही वापर
कृषी विभागाने जिल्ह्यात ५९ हजार हेक्टर सोयाबीन पेरणीचे प्रस्तावित क्षेत्र दाखविले आहे. त्यामुळे बियाणांची टंचाई होण्याची शक्यता आहे. ते कमी पडू नये म्हणून उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यातून ६५०० क्विंटल उत्पादन हाती येईल. हे पेरणीसाठी वापरण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन आहे.