जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलवर ५६ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:14+5:302021-09-09T04:32:14+5:30
सांगली : माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १७६ जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल बनविल्या जाणार आहेत. भौतिक ...
सांगली : माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १७६ जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल बनविल्या जाणार आहेत. भौतिक सुविधा आणि गुणवत्ता विकासासाठी तब्बल ५६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. प्राथमिक शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डुडी पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्ह्यातील १७६ शाळांची मॉडेल स्कूलसाठी निवड केली आहे. प्रत्येक केंद्रातून एक शाळा निवडली असून शासकीय योजना आणि लोकसहभागातून शैक्षणिक विकास चळवळ उभी केली आहे. मॉडेल शाळा संकल्पनेत विविध योजनेतून इमारत विकास, इमारत दुरुस्ती, शाळेला संरक्षक भिंती, पिण्याच्या पाण्याची सोय, क्रीडांगण सपाटीकरण या भौतिक सुविधा केल्या जाणार आहेत. शिक्षण विकासासाठी डिजिटल शाळा, ग्रंथालय, आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा केल्या जातील. शासकीय विविध योजनांतून तब्बल ५६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. याशिवाय मॉडेल स्कूलसाठी लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी लोकांशी संवाद साधला जाईल. हा बदल शिक्षण बदलाची चळवळ म्हणून पुढे येईल. जिल्ह्यातील मॉडेल स्कूलची कामे दि. ३१ डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण होणार आहेत.
चौकट
शिक्षकांना प्रशिक्षण देणार
जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेवर भर द्यावा लागणार आहे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. डाएटच्या माध्यमातून शिक्षकांतून चांगले प्रशिक्षक तयार केले जातील. या प्रशिक्षकांकडून दि. १० ऑक्टोबरपासून २५ दिवसांचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मॉडेल स्कूल आणि गुणवत्तेसाठी सरपंच, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांसोबतही स्वतंत्र बैठक घेणार आहे.
चौकट
ग्रामपंचायत कारभाऱ्यांसाठी प्रशिक्षण
जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रारी दाखल होत आहेत, याबाबतची दखल घेऊन यशदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सरपंचांना प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात खानापूर तालुक्यातून बुधवारी झाली आहे. पुढील पंधरा दिवसात सर्व तालुक्यातील सरपंचांचे प्रशिक्षण पूर्ण होईल, असेही डुडी म्हणाले.