महापालिकेकडून ५६ मोबाईल टॉवर सील
By admin | Published: March 26, 2017 11:34 PM2017-03-26T23:34:26+5:302017-03-26T23:34:26+5:30
थकबाकीपोटी कारवाई : मोबाईल कंपन्यांची धावपळ; जप्तीसाठी धडक मोहीम
सांगली : महापालिकेने थकीत करापोटी मालमत्ता धारकांसह आता मोबाईल कंपन्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. रविवारी सुटीदिवशी महापालिकेच्या कर संकलन पथकाने तीनही शहरातील ५६ मोबाईल टॉवर सील केले. या कंपन्यांकडे ३ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. टॉवर सील केल्यानंतर मोबाईल कंपन्यांची धावपळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत कंपन्यांचे प्रतिनिधी महापालिकेच्या कर विभागात तळ ठोकून होते.
महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी थकीत कर वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या दहा दिवसांत कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यासाठी पाच वॉरंट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात एकाचवेळी मालमत्ता जप्तीची धडक मोहीम सुरू आहे. गेल्या चार दिवसात विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, पतसंस्थांसह वैयक्तिक मालमत्ता सील केल्या जात आहेत. रविवारी मालमत्ताधारकांपाठोपाठ मोबाईल कंपन्यांच्या टॉवरवरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
सांगलीत नितीन शिंदे, काका हलवाई, काका तांबोळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध भागात असणारे ५६ मोबाईल टॉवर सील केले. यात सर्वच मोबाईल कंपन्यांचा समावेश होता. सांगलीत २६, मिरजेत २७, तर कुपवाड परिसरातील तीन टॉवर सील झाले. या मोबाईल कंपन्यांकडे तीन कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. मध्यंतरी मोबाईल कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. डिसेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मोबाईल कंपन्यांची याचिका निकाली काढली असून, महापालिकांना कर वसुलीचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेने वारंवार या मोबाईल कंपन्यांना नोटिसा बजावून थकीत कर भरण्याचे आदेश दिले. पण मार्च महिना संपत आला तरी मोबाईल कंपन्यांकडून फारशी हालचाल झाली नव्हती. त्यात रविवार हा सुटीचा दिवस निवडून महापालिकेने टॉवरवर कारवाईचा बडगा उगारला. एकेक टॉवर सील होत गेल्याने शहरातील मोबाईल सेवा विस्कळीत झाली. ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागताच मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे धाव घेतली. सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे हे दिवसभर कर विभागात थांबून आढावा घेत होते. मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी वाघमारे यांची भेट घेऊन, ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरू, टॉवरचे सील काढा, अशी विनंती केली. पण वाघमारे यांनी कर भरल्याशिवाय सील काढले जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. रात्री उशिरापर्यंत मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी थकबाकीचा नेमका आकडा घेत होते. येत्या दोन दिवसात थकीत करापोटी धनादेश देऊ, अशी आर्जवही करीत होते. (प्रतिनिधी)