सांगली जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेत ५७ लाखाचा अपहार; शाखाधिकारी, लिपिकावर निलंबनाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 01:20 PM2024-02-21T13:20:42+5:302024-02-21T13:21:14+5:30

बँकेच्या दक्षतेने प्रकार उघडकीस

57 lakh embezzlement in Sangli District Bank Nelkaranji branch, Suspension action on Branch Officer, Clerk | सांगली जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेत ५७ लाखाचा अपहार; शाखाधिकारी, लिपिकावर निलंबनाची कारवाई 

सांगली जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेत ५७ लाखाचा अपहार; शाखाधिकारी, लिपिकावर निलंबनाची कारवाई 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी (ता. आटपाडी) शाखेत शाखाधिकारी आणि लिपिकाने तब्बल ५७ लाख ५९ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. शाखाधिकारी मच्छिंद्र म्हारगुडे आणि लिपिक प्रतीक पवार या दोघांवर बँकेने निलंबनाची कारवाई मंगळवारी केली. याप्रकरणी चौकशी सुरू असून अपहाराच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे, असेही जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेत मासिक व्याजाच्या रकमेत तफावत असल्याचा संशय तालुकाधिकाऱ्यांना आला. त्यानंतर तालुका अधिकाऱ्यांनी शाखेची अंतर्गत तपासणी सुरू केली. त्या तपासणीमध्ये अपहार असल्याचे उघडकीस आले. संबंधित शाखाधिकारी म्हारगुडे व लिपिक पवार या दोघांनी संगनमताने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

जी बँक खाती कमी वापराची आहेत, त्या खात्यावर जादाचे व्याज जमा करून त्यासाठी पैसे परस्पर काढले आहेत. त्यासाठी संबंधित खात्याच्या नावाने बँकेचे एटीएम स्वतःच घेतले. त्याचा मागमोस संबंधित खातेदारांना लागू दिला नाही. त्याच एटीएमवरून सर्व पैसे काढण्यात आले. प्राथमिक तपासणीमध्ये ५७ लाख ५९ हजार इतक्या रकमेचा अपहार दिसून येत आहे. त्यापैकी ४८ लाख रुपये खात्यावरून उचलले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी बँकेने संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावून तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. बँकेच्या लेखापरीक्षकांमार्फत शाखेची अंतर्गत तपासणी सुरू केली आहे. यामध्ये आणखी अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फौजदारी गुन्हे दाखल होणार

जिल्हा बँकेकडून संबंधित शाखाधिकारी म्हारगुडे आणि लिपिक पवार यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

बँकेच्या दक्षतेने प्रकार उघडकीस

बँकेच्या नियमित तपासणीमध्ये बँकेकडून देणे व्याज जास्त नावे पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नेलकरंजी शाखेचा नफा कमी होऊ लागला. हा नफा का कमी होतोय, याबाबतची शंका उपस्थित झाली. त्यामुळे तालुकाधिकाऱ्यांनी शाखेची तपासणी केली. या तपासणीमध्ये शाखाधिकारी आणि लिपिकाकडून अपहार उघडकीस आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी दिली.

Web Title: 57 lakh embezzlement in Sangli District Bank Nelkaranji branch, Suspension action on Branch Officer, Clerk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.