सांगलीत लोकसभा निवडणुकीवर राहणार ५७ चित्रीकरण पथकांची नजर
By अशोक डोंबाळे | Published: April 22, 2024 03:30 PM2024-04-22T15:30:42+5:302024-04-22T15:33:43+5:30
प्रत्येक हालचाल चित्रीकरणाद्वारे टिपणार : वस्तुस्थिती येणार समोर
सांगली : सांगली लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारादरम्यान सभा, बैठका, रॅली, कॉर्नर सभा आदींवर लक्ष ठेवण्यासाठी ५७ व्हिडीओ चित्रीकरण पथके जिल्हाभर तैनात केली जाणार आहेत.
आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होतेय की नाही, प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने, मनुष्यबळ, झेंडे, फुले-हार आदींचे चित्रीकरण पथकांद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १८ लाख ६५ हजार ९६० मतदार आहेत. २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा जोर वाढत असून, उमेदवारांनी लोकसभा क्षेत्र पिंजून काढण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे प्रशासनानेही तयारी पूर्ण केली आहे.
एक दिवसाचे प्रशिक्षण
जिल्हाभरात तैनात केलेल्या चित्रीकरण पथकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये चित्रिकरणाचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे. कोणकोणत्या हालचाली, कार्यक्रम, सभा, बैठका, प्रचार आदींमधील मनुष्यबळ, त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आदींबाबत पथकांना मार्गदर्शन करण्यात आले.
विविध प्रक्रियांचे चित्रीकरण
लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीपासून तर मतदान प्रकिया पार पडेपर्यंत ठिकठिकाणच्या राजकीय, सामाजिक हालचाली या चित्रीकरणाद्वारे टिपण्यात येणार आहेत. याशिवाय उमेदवारांचा प्रचार, सभा, बैठका, कॉर्नर सभा, रॅली, त्यातील वाहने, प्रचारातील मनुष्यबळ, सभा-बैठकांसाठी वापरण्यात येणाऱ्या खुर्च्या, फुले-हार आदींचे व्हिडीओ चित्रीकरण या पथकाद्वारे केले जाणार आहे.
चित्रीकरण पुरावा म्हणून नोंदविला जाणार
एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचे पालन झाले की नाही, त्याची शहानिशा करण्यासाठी चित्रीकरणाचा पुरावा विचारात घेतला जाणार आहे. याशिवाय उमेदवाराने घेतलेल्या परवानगीपेक्षा जास्त वाहने, खुर्च्या, बॅनर्स, झेंडे वापरले असल्यास त्यासाठी चित्रीकरणाचा पुरावा खर्चाचा हिशेब देताना विचारात घेतला जाणार आहे. उमेदवाराने दिलेला खर्च कमी आढळल्यास या चित्रीकरणाच्या वस्तुस्थितीनुसार खर्चाचा हिशेब देण्यास उमेदवाराच्या लक्षात आणून देण्यात येणार आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय पथके
विधानसभा मतदारसंघ - व्हिडीओ चित्रीकरण पथके
मिरज - ६
सांगली - ७
पलूस-कडेगाव - ७
खानापूर - १०
तासगाव-क.महांकाळ - ८
जत - ७
इस्लामपूर - ५
शिराळा - ७
एकूण - ५७