सांगली जिल्ह्याच्या विकासाचा ५७३ कोटींचा आराखडा - पालकमंत्री सुरेश खाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 05:05 PM2024-08-17T17:05:14+5:302024-08-17T17:05:29+5:30
सांगली : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, यासाठी शासनाचे प्रयत्न सुुरू आहेत. यासाठी जिल्ह्याच्या ...
सांगली : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, यासाठी शासनाचे प्रयत्न सुुरू आहेत. यासाठी जिल्ह्याच्या विकासकामांचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५७३ कोटींचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुरेश खाडे बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, डॉ. विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.
सुरेश खाडे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ४ लाख ६० हजार अर्ज प्राप्त झाले असून जिल्ह्यात यापैकी ४ लाख ४५ हजारांहून अधिक अर्जांना मान्यता दिली आहे. या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ९० हजारांपेक्षा अधिक कामगारांना विविध योजनेंतर्गत जवळपास २२० कोटींहून अधिक रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
प्रशांत पाटील यांचा गौरव
जम्मू-काश्मिर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांना त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट व २० लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मान केला.
वल्लभी शेंडगेचाही गौरव
सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलची वल्लभी शेंडगे हिने गार्डनमधील अनोख्या झोपाळ्याचे केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे. याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
यांचा शासनाकडून गौरव
पोलिस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या अनुक्रमे मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, विटा उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस हवालदार सागर लवटे, पोलिस नाईक संदीप नलावडे, पोलिस फौजदार महेश जाधव व शरद माने, सहायक पोलिस फौजदार राजेंद्र पाटील, चालक पोलिस हवालदार अनिल सूर्यवशी व संजय माने यांच्यासमवेत महसूल दिनानिमित्त महसूल विभागातील, विभागीय स्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील, लघुटंकलेखक वहिदा तांबोळी-मणेर, अव्वल कारकून विनायक यादव यांचा पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते सत्कार केला.