सांगली जिल्ह्यातील ५७६ शिक्षक पदांची भरती होणार, पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 05:18 PM2024-01-06T17:18:51+5:302024-01-06T17:19:13+5:30
गेल्या ११ वर्षांत भरती नाही, शासनाकडून ७० टक्के पदे भरण्यास मान्यता
सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नव्हती. यामुळे डी.एड. विद्यार्थ्यांचे भरतीकडे लक्ष लागून होते. अखेर शासनाने जिल्हा परिषद भरतीला मान्यता दिली आहे. यामुळे ५७६ पदांसाठी येत्या पंधरा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षक भरती करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये आकडेवारीचा ताळमेळ लावण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. प्रशासनाकडून भरतीच्या अनुषंगाने सर्व माहिती लवकरच पवित्र पोर्टलवर नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर भरती जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमामध्ये ६९४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तसेच कन्नड ८८ आणि उर्दू ४०, अशा एकूण ९२२ जागा रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार रिक्त जागांच्या ७० टक्के जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे मराठी माध्यमामध्ये ४८६, कन्नड ६२ आणि उर्दू २८, अशा एकूण सुमारे ५७६ जागांवर शिक्षकांची भरती होणार आहे.
गेल्या ११ वर्षांत भरती नाही
२०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच २००५ पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. केवळ २०१९ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत काही जागा भरण्यात आल्या. मात्र, या भरतीमध्ये काही पदांचा गुंता झाला होता. कित्येक वर्षे भरतीच झाली नसल्याने अनेक शाळेत एका शिक्षकास दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली. यातून गुणवत्ता ढासळत आहे. मात्र, पुढील काही दिवसांत हा प्रश्न निकालात निघणार आहे.