सांगली लोकसभेसाठी सुमारे ५८ टक्के मतदान; आता निकालाची उत्सुकता; ४ जूनला मतमोजणी
By अशोक डोंबाळे | Published: May 7, 2024 09:17 PM2024-05-07T21:17:51+5:302024-05-07T21:19:40+5:30
महायुतीचे उमेदवार संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील यांच्यासह २० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. निकाल ४ जून रोजी लागणार असला तरी आतापासून निकालाची उत्सुकता दिसून येत आहे.
सांगली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सुमारे ५८ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतीम आकडेवारी ६१ टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. महायुतीचे उमेदवार संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील यांच्यासह २० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. निकाल ४ जून रोजी लागणार असला तरी आतापासून निकालाची उत्सुकता दिसून येत आहे.
काहीठिकाणचे किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली. सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघातील काही अपवाद वगळता १ हजार ८३० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. भाजपचे संजय पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांचे बूथ सर्वत्र दिसत होते. महिला, पुरुषांसह तरुण मतदार, दिव्यांग मतदारांनीही मतदानात उत्साहाने भाग घेतला. पहिल्या टप्प्यात ९ वाजतापर्यंत ५.८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी १ वाजता मतदानाची टक्केवारी २९.६५ झाली होती. उन्हाचा तडाखा असतानाही २३.८ टक्क्यांनी मतदान वाढले. तिसऱ्या टप्प्यात ३ वाजता ४१.३० टक्के इतके मतदान झाले. दुपारी ३ ते ५ या वेळेत सरासरी ५२.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सांगली लोकसभेसाठी ५८ टक्केपर्यंत मतदान झाले. पण, सायंकाळी ६ वाजलेनंतर १२० मतदान केंद्रावर मतदान चालूच होते. मतदानाची अंतीम आकडेवारी ६१ टक्केंवर जाण्याची शक्यता आहे.
साखराळेत धैर्यशील माने-सत्यजीत पाटील गटात राडा
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे (ता. वाळवा) येथील बूथ क्रमांक ६२ आणि ६३ वर उमेदवार साळुंखे यांच्यावर नेमलेल्या दोन एजंट बोगस आहेत. या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने आणि उद्धव सेनेचे उमेदवार सत्यजीत पाटील यांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली. यामध्ये वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हाणामारीचा प्रकार टळला.
सांगली लोकसभेसाठी झालेले मतदान
विधानसभा मतदारसंघ टक्केवारी
मिरज ५९
सांगली ५७.५०
तासगाव-कवठेमहांकाळ ६१.१६
जत ५९.३२
खानापूर ५१.११
पलूस-कडेगाव ५६.४५
एकूण ५८