पंढरपूरच्या नगरसेवकासह ६ जणांवर गुन्हा

By admin | Published: February 6, 2017 01:11 AM2017-02-06T01:11:58+5:302017-02-06T01:11:58+5:30

सांगलीतील गोळीबार प्रकरण; कार्यकर्त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कृत्य

6 people including Pandharpur corporator | पंढरपूरच्या नगरसेवकासह ६ जणांवर गुन्हा

पंढरपूरच्या नगरसेवकासह ६ जणांवर गुन्हा

Next

सांगली : येथील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे गोवर्धन चौकात अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (वय २२) या तरुणावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी पंढरपूर (जि. सोलापूर) येथील नगरसेवक संदीप पवार यांच्यासह सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक संदीप पवार, अर्जुन पवार, सचिन चौगुले, भैया पवार, नागेश धोत्रे व रामा पवार (सर्व रा. पंढरपूर) यांचा समावेश आहे. बबलू सुरवसे हा मूळचा पंढरपूरचा आहे. दोन वर्षांपूर्वी पंढरपूरमध्ये नीलेश माने या तरुणाचा खून झाला होता. या खूनप्रकरणी बबलूला अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या आई, वडिलांनी त्यास सांगलीत मामाकडे राहायला पाठविले होते. तेव्हापासून बबलू सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे मामाकडे राहतो. त्याच्या मामांचा बांबू विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी मामाच्या दुकानातून शहरात कामानिमित्त दुचाकीवरून येताना सहाजणांच्या टोळीने त्याच्यावर गोळीबार केला होता. नेम चुकल्याने बबलू बचावला होता. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने भेट देऊन संशयितांच्या शोधासाठी नाकाबंदी केली होती. रात्री उशिरापर्यंत बबलूकडे चौकशी केली जात होती. त्यानंतर त्याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
पंढरपूरमध्ये खून झालेला नीलेश माने हा नगरसेवक संदीप पवार यांचा कार्यकर्ता होता. दोन वर्षापूर्र्वी भरदिवसा त्याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात बबलूसह सहा ते सात संशयितांना अटक करण्यात आली होती. बबलूला अटक झाल्यानंतर त्याच्या आई, वडिलांनाही मारहाण झाली होती. तेव्हापासून बबलूचे कुटुंब घाबरुन होते. त्यामुळे बबलू जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला सांगलीत मामाकडे रहायला पाठविले होते. नीलेश माने याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नगरसेवक संदीप पवार व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे बबलूने फिर्यादीत म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहर पोलिसांचे पथक येत्या एक-दोन दिवसात पंढरपूरला रवाना होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी पंढरपूर पोलिसांशी संपर्क साधून बबलूविरुद्ध दाखल असलेला गुन्हा, नीलेश मानेचा खून कशातून झाला होता? नगरसेवक संदीप पवार यांची पार्श्वभूमी याची माहिती घेतली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 6 people including Pandharpur corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.