सुएझमध्ये अडकले सांगलीतील द्राक्षाचे ६० कंटेनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:32+5:302021-03-28T04:25:32+5:30

सांगली : पनामाचे मालवाहतूक जहाज चीनहून नेदरलँडकडे जाताना सुएझ कालव्यात अडकून तिरके झाल्यामुळे जलवाहतूक ठप्प झाली आहे. त्या कोंडीत ...

60 containers of grapes from Sangli stuck in Suez | सुएझमध्ये अडकले सांगलीतील द्राक्षाचे ६० कंटेनर

सुएझमध्ये अडकले सांगलीतील द्राक्षाचे ६० कंटेनर

Next

सांगली : पनामाचे मालवाहतूक जहाज चीनहून नेदरलँडकडे जाताना सुएझ कालव्यात अडकून तिरके झाल्यामुळे जलवाहतूक ठप्प झाली आहे. त्या कोंडीत युरोप आणि रशियाकडे निघालेल्या सांगली जिल्ह्यातील द्राक्षाच्या ६० कंटेनरचा समावेश आहे. या कंटनेरमध्ये ९०० टन द्राक्षे असून त्यांची किंमत आठ कोटी १० लाखांपर्यंत आहे. रिकामे कंटेनरही परत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित द्राक्ष निर्यात खोळंबली आहे.

यंदा द्राक्ष निर्यातीसाठी जिल्ह्यातील ४६४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २२५६ हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यात सुरू आहे. त्यातील ६० टक्के द्राक्षांची ३५८ कंटनेरमधून युरोपमधील फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लिथुएनिया, नेदरलँड, स्पेन आदी देशांमध्ये निर्यात झाली आहे. सध्या सुएझ कालव्यात जलवाहतूक ठप्प झाल्याने जिल्ह्यातील खानापूर, मिरज, तासगाव तालुक्यातील ९०० टन द्राक्षे घेऊन जाणारे ६० कंटेनर अडकले आहेत. तेथे अडकलेले जहाज निघून वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत द्राक्षांचे कंटेनर समुद्रातच अडकून राहिल्यामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याशिवाय पूर्वी निर्यात झालेल्या मालाचे कंटेनर परत घेऊन येण्यासाठीचा मार्गही बंद आहे. यामुळे जिल्ह्यात शिल्लक असलेल्या ४० ते ३५ टक्के निर्यातक्षम द्राक्षाचे करायचे काय, असा प्रश्न भेडसावत आहे.

कोट

युरोपला जाण्यासाठी एकमेव जवळचा मार्ग सुएझ कालव्यातून जातो. तेथे अडकलेले जहाज सरळ होत नाही, तोपर्यंत युरोपची सर्वच निर्यात ठप्प होणार आहे. जिल्ह्यातील ६० कंटेनर अडकले असून, अजून १०० कंटेनर जाणार होते; पण रिकामे कंटेनरच नसल्यामुळे द्राक्षे पाठवायची कशी, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.

-संभाजी निकम, निर्यातदार, सावळज, ता. तासगाव.

चौकट

चीन, अरब राष्ट्रांची निर्यात सुरळीत

सौदी अरेबिया, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, ओमान, चीन, संयुक्त अरब अमिराती या मार्गावरील समुद्रातील मालवाहतूक सुरळीत सुरू आहे. यामुळे युरोपऐवजी या देशांमध्ये द्राक्ष निर्यातीची संधी आहे. शिल्लक द्राक्षाच्या निर्यातीसाठी तसे प्रयत्न केले तर शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल, असे द्राक्षउत्पादक महादेव पाटील यांनी सांगितले.

Web Title: 60 containers of grapes from Sangli stuck in Suez

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.