कुंभारीच्या लिपिकाकडून ६० लाखांचा अपहार, सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेत असताना मारला डल्ला
By हणमंत पाटील | Published: May 23, 2024 05:25 PM2024-05-23T17:25:57+5:302024-05-23T17:26:12+5:30
संचालकाचा नातेवाईकही अपहारात
सांगली : दुष्काळी निधी अपहारप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने तिघांवर कारवाई केली आहे. या चौकशीत कुंभारी (ता. जत) शाखेतील कर्मचारी संजय पाटील (रा. शिरगाव, ता. तासगाव) यांनी अपहार केल्याचे पुढे आले आहे. ते तासगाव मार्केट यार्ड शाखेत काम करत असताना त्यांनी सुमारे ६० लाखांचा अपहार केला आहे. या शाखेची तपासणी सुरू असून, संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यावर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीवर बॅँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेतील कर्मचारी योगेश वजरीनकर याने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निमणी शाखेतही असाच प्रकार पुढे आला. त्या शाखेतील कर्मचारी प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदत निधीतील २१ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. त्यानंतर संपूर्ण तासगाव तालुक्यातील शाखांची तपासणी सुरू करण्यात आली.
या अपहारप्रकरणी संचालक मंडळाची सोमवारी तातडीने बैठक घेण्यात आली. त्यात वजरीनकर, कुंभार यांच्यासह तासगाव मार्केट यार्ड शाखाधिकारी एम. वाय. हिले या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. चौकशीनंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्याशिवाय सलग पाच वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच शाखांची तपासणी करण्यात येणार आहे. तासगाव शाखेची तपासणी करत असताना या शाखेतील तत्कालीन कर्मचारी संजय पाटील (सध्या कुंभारी, ता. जत) याने सुमारे ६० लाखांचा अपहार केल्याचे पुढे आले आहे. पाटील यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर काही दिवसांपूर्वी तडकाफडकी कुंभारी येथे बदली करण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी ते तासगाव शाखेत कार्यरत होते. त्यावेळी हा अपहार त्यांनी केला असल्याचा संशय आहे.
संचालकाचा नातेवाईकही अपहारात
जिल्हा बॅँकेत सध्या गाजत असलेल्या शासनाच्या दुष्काळी, अवकाळी मदत निधीतील अपहारात बॅँकेच्या एका संचालकाचा नातेवाईकच अडकला आहे. या घोटाळ्यात त्याचे नाव पुढे येताच संबंधित संचालकाने बॅँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून चौकशीपूर्वीच घोटाळ्याची रक्कम भरून घेण्यास भाग पाडले. तसेच या नातेवाईकाचे नाव रेकॉर्डवर येऊ नये, यासाठी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालवला आहे.