Sangli: पेठनाक्यावर पकडला तब्बल ६० लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा, वाहन चालक ताब्यात
By हणमंत पाटील | Published: October 25, 2023 03:42 PM2023-10-25T15:42:30+5:302023-10-25T15:43:24+5:30
युनूस शेख इस्लामपूर : इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पेठनाका येथे सापळा रचून तब्बल ६० लाखांचा गोवा बनावटीच्या ४८ ...
युनूस शेख
इस्लामपूर : इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पेठनाका येथे सापळा रचून तब्बल ६० लाखांचा गोवा बनावटीच्या ४८ हजार बाटल्यांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. सोमवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये मालट्रकसह ७५ लाखांचा मुद्देमाल आणि चालकास ताब्यात घेण्यात आले. इस्लामपूर पोलीस ठाण्याची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली.
सलमान मकानदार (रा.डफळापूर, ता.जत) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. हा दारू साठा कराड येथील जमील पटेल याच्याकडे जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी दुसरे पथक रवाना झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर लगेच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पेठनाका परिसरात सापळा लावला. रात्री १० च्या सुमारास परिसरात नाकाबंदी लावत संशयित ट्रक (एम एच ५० एन ३९९९) थांबविण्यात आला. तपासणी केली असता तब्बल ६० लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई सहायक निरीक्षक चेतन माने, हवालदार विनायक देवळेकर, अभिजित पाटील, उदय पाटील, गुप्त वार्ता विभागाचे अमर जंगम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.