अठ्ठावीस लाख जनतेला ६१० डॉक्टर देतात सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:33+5:302021-04-25T04:25:33+5:30
सांगली : आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि सांगली, मिरज शासकीय आरोग्य रुग्णालयातील ६१० डॉक्टर, बाराशे आरोग्य ...
सांगली : आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि सांगली, मिरज शासकीय आरोग्य रुग्णालयातील ६१० डॉक्टर, बाराशे आरोग्य सेविका व सेवक जिल्ह्यातील २८ लाख जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. कोरोनाच्या महामारीतही शासकीय आरोग्य यंत्रणाच सक्षमपणे जनतेला आरोग्य सेवा देत आहे.
जिल्ह्यात ६१ आरोग्य केंद्रे आणि ३३६ आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा दिली जात आहे. लहान मुले, गरोदर मातांचे लसीकरण, नियमित आजाराच्या रुग्णांवर उपचार होत आहेत. सध्या कोरोनाच्या महामहारीतही एमबीबीएसचे १२२ डॉक्टर, कंत्राटी ६० डाॅक्टर आणि ४०३ आरोग्य सेविका व सेवक अखंडित एक वर्षे जनतेला आरोग्य सेवा देत आहे. नियमित उपचाराबरोबरच कोरोना रुग्णांनाही ही यंत्रणा उपचार देत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून १२५ कंत्राटी डॉक्टर, १९० अधिपरिचारिकांची नियुक्ती केली आहे.
शिराळा तालुक्यातील कोकरुड, वाळवा तालुक्यातील आष्टा, कडेगाव तालुक्यातील चिंचणी, खानापूर तालुक्यातील विटा, करंजे, आटपाडी, तासगाव, जत तालुक्यात जत, माडग्याळ, मिरज तालुक्यात बेळंकी येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. प्रत्येक रुग्णालयात तीस बेड, तीन वैद्यकीय अधिकारी, सात अधिपरिचारीका, क्ष-किरण तत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्र कार्यरत आहेत. प्रयोगशाळा, ऑपरेशन थिएटर, एक्सरे मशीनही उपलब्ध आहेत. याशिवाय इस्लामपूर आणि कवठेमहांकाळमध्ये ५० बेडचे उपजिल्हा रुग्णालये कार्यरत आहेत. या प्रत्येक रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, सात वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका १५ पदे मंजूर आहेत. प्रसूती, किरकोळ दुखापत आणि शस्त्रक्रियाही केल्या जात आहे. नियमित उपचाराबरोबरच कोरोना रुग्णांनाही उपचार देण्यात सध्या शासकीय आरोग्य सेवाच आघाडीवर आहे. यामध्ये डॉक्टर, अधिपरिचारिका असो अथवा रुग्णवाहिकेचा चालक मोठ्या धाडसाने कोरोना रुग्णांना धीर देत आहे. यावरून शासकीय आरोग्य सेवा किती सक्षम केली पाहिजे, याचा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
चौकट
जिल्ह्यात अशी आहे शासकीय आरोग्य सेवा
- आरोग्य केंद्र संख्या : ६१
- बेड : ३६६
- उपकेंद्र : ३३६
- आरोग्य केंद्रातील कार्यरत एमबीबीएस डॉक्टर : १२२
- आरोग्य सेविका : २७१
- आरोग्य सेवक : १३२
- ग्रामीण रुग्णालय : ११
- बेड संख्या : ३३०
- वैद्यकीय अधिकारी : ३३
- अधिपरिचारिका : ७७
- उपजिल्हा रुग्णालये : २
- वैद्यकीय अधिकारी : १४
- अधिपरिचारिका : ३०