महापालिका कोविड सेंटरमधून ६५२ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 06:00 PM2021-05-17T18:00:22+5:302021-05-17T18:02:04+5:30
CoronaVirus Sangli : सांगली महापालिकेच्या मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (जीपीएम) कोविड सेंटरमधून गेल्या २१ दिवसांत ६५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १६६ रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये सर्वच रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संकटात महापालिकेच्या कोविड सेंटरने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा आधार दिला आहे.
सांगली : महापालिकेच्या मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (जीपीएम) कोविड सेंटरमधून गेल्या २१ दिवसांत ६५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १६६ रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये सर्वच रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संकटात महापालिकेच्या कोविड सेंटरने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा आधार दिला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील रुग्णांची संख्या वाढताच आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आदिसागर मंगल कार्यालय अवघ्या सात दिवसांत शंभर ऑक्सिजन बेडचे सेंटर सुरू केले. या सेंटर्सच्या मदतीसाठी समाजातून अनेक दानशूर व्यक्तींही पुढे आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर सर्व साहित्य महापालिकेने एकत्रित जमा केले. मात्र एप्रिल महिन्यात पुन्हा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताच आयुक्तांनी मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू केले. तीन ते चार दिवसांतच १२० बेडचे हे सेंटर सुरू झाले.
या कोविड सेंटरमध्ये पश्चिम महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. गेल्या २१ दिवसांत ८८३ रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ६५२ कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना कोविडमुक्त करण्यात आले आहे. उपायुक्त स्मृती पाटील आणि साहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय स्टाफ २४ तास अलर्ट आहे. महापालिकेच्या जीपीएम कोविड सेंटरमध्ये ५० ड्युरा सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरविला जात आहे. याचबरोबर रुग्णांना वेळेत जेवणाबरोबर त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी सेवा बजावित आहेत. रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकही मृत्यू नाही
महापालिका अतिक्रमण विभागाकडून दररोज २ ते ३ ड्युरा सिलिंडर पोहोच करण्याचे कामही दैनंदिन सुरू आहे. यासाठी ८० जणांचा स्टाफ कार्यरत आहे. या २१ दिवसांत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. याचबरोबर व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या ६५ रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले. जीपीएममधून रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.